
मुंबईतील रक्तपेढय़ांचे खासगीकरण करून आणि मोकळय़ा मैदानांचे आरक्षण बदलून मुंबईकरांचे रक्त आणि श्वास विकण्याचा घाट मिंधे-भाजपने घातला आहे, असा जोरदार हल्ला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज चढवला. मिंधे-भाजपच्या या कारस्थानाला शिवसेना पूर्ण ताकदीनिशी विरोध करेल, असा इशाराही त्यांनी दिला.
मुंबई महानगरपालिकेच्या सुधार समितीची उद्या बैठक आहे. सुधार समितीचे अध्यक्ष एकनाथ शिंदे गटाचे आहेत. त्या बैठकीत मुंबईविरोधी काही प्रस्ताव मांडले जाणार आहेत. त्यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद बोलवून प्रसारमाध्यमांना माहिती दिली.
सुधार समिती नव्हे, बिघाड समिती
मुंबई महापालिकेमधील सुधार समितीचे काम पाहता आता तिचे नाव ठेवण्याची वेळ आली आहे, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला. महापालिकेत प्रशासकांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले असून त्याबाबत श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी शिवसेनेने अनेकदा करूनही ती काढली गेली नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
मलबार हिलमधील मैदानाचे उद्योगपतीसाठी आरक्षण बदलणार
डी वॉर्डमध्ये मलबार हिल येथे असलेल्या रिक्रिएशन ग्राऊंडचे आरक्षण बदलून तो निवासी भूखंड बनवण्याचाही एक प्रस्ताव उद्या येणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. त्या मैदानाच्या बाजूला एका उद्योगपतीचा बंगला होता. तो पाडून त्यांना दोन्ही भूखंड एकत्र करून टॉवर बांधायचाय की बंगला हे माहीत नाही. त्यामुळे मैदानाचा भूखंड निवासी करण्यासाठी कुणी अर्ज दिला होता ही माहिती प्रसारमाध्यमांनी काढावी, असे आदित्य ठाकरे म्हणाले. मैदानाचा भूखंड निवासी केलात तर शिवसेना त्या उद्योगपतीच्या घरावर मोर्चा काढेल आणि भूखंडावर एक वीटही रचू देणार नाही, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.
हे मुंबईविरोधी प्रस्ताव रद्द झाले नाहीत तर उद्या पत्रकार परिषद घेऊन त्या उद्योगपतीचे नाव पुराव्यांसकट जगासमोर आणू असा इशारा देतानाच, मिंधेंना भाजपने पाठिंबा दिला तर भाजपलाही मुंबई लुटायची आहे हे स्पष्ट होईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले. या पत्रकार परिषदेला शिवसेना नेते विनायक राऊत व आमदार अनिल परब, उपनेता व नगरसेवक विशाखा राऊत, साईनाथ दुर्गे आदी उपस्थित होते.
रक्त विकून पैसे कमवायचेत
आदित्य ठाकरे म्हणाले की, महापालिकेच्या रक्तपेढय़ांसाठी मुंबईकर आणि शिवसैनिक रक्तदान करतात. तिथे रुग्णांसाठी रक्त मोफत दिले जाते. या रक्तपेढय़ांचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव उद्या मांडला जाणार आहे. खासगीकरणानंतर रक्ताच्या एका पिशवीसाठी 1100 रुपये घेतले जाणार आहेत आणि त्यापेक्षा जास्त पिशव्या लागल्या तर प्रत्येक पिशवीसाठी 1600 ते 2 हजार रुपये दर आकारले जाणार आहेत. मुंबईकरांचे रक्त मिंधे आणि भाजपा विकायला निघालेत हेच या प्रस्तावातून स्पष्ट होतेय असा आरोप करतानाच, मुंबईचे रक्त विकायचेय का यावर भाजपनेही भाष्य करावे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. महापालिकेच्या रक्तपेढय़ांवर भाजप व मिंधेंचा डोळा आहे, रक्तातूनही यांना पैसे कमवायचे आहेत, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
वांद्रय़ातील फुटबॉल मैदानाला एक्झिबिशन सेंटर बनवण्याच्या हालचाली
वांद्रे पश्चिम येथे गेल्या दहा वर्षांपासून असलेल्या फुटबॉल ग्राऊंडवर एक्झिबिशन सेंटर बनवण्याचा प्रस्तावही उद्या आणला जाणार आहे. त्या मैदानावर युवा लीग सामन्यांमध्ये साडेसात हजारांवर मुले खेळतात. तिथे फुटबॉल सामन्यांसाठी एक रुपयाही शुल्क घेतले जात नाही. तिथे सरकारला एक्झिबिशन व कन्व्हेन्शन सेंटर करायचे आहे. रंगशारदाच्या मागे म्हाडाची जागा ढापून कुणीतरी विंग्स नावाचे मैदान बनवले आहे. ते सामन्यासाठी फी घेतात. ते यापेक्षा मोठे मैदान आहे. कॊन्व्हेन्शन सेंटर करायचे तर तिथे का केले नाही? वांद्रय़ाच्या जागेवर डोळा का, असा संतप्त सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आरजीमध्ये एक असोसिएशन काम करतेय म्हणून त्या मैदानावर मिंधे-भाजपचा डोळा आहे, असेही ते म्हणाले.
डील पूर्ण न झाल्यामुळेच बैठक रद्द
सुधार समितीची बैठक 20 मे रोजी होणार होती; परंतु 19 तारखेला ती अचानकपणे रद्द करण्यात आली. कदाचित त्यावेळी डील पूर्ण झाली नसल्यामुळेच बैठक रद्द झाली असावी असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याच्या बाजूच्या गल्लीत ग्रीन झोनमधल्या एका भूखंडाचे आरक्षण बदलून तो निवासी करण्याचा प्रस्तावही उद्याच्या बैठकीत येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या नाकाखालून मिंधे काय करताहेत याचा विचार आता मुख्यमंत्र्यांनीच करावा.




























































