
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वापरणाऱ्या युजर्ससाठी एक अत्यंत निराशाजनक बातमी आहे. आपल्या युजर्सना ‘X Premium’ सबस्क्रिप्शन घेण्यास भाग पाडण्यासाठी कंपनीने आता एक नवीन खेळी खेळली आहे. ‘X’ ने आपल्या हेल्प सेंटरच्या पेजवर केलेल्या नवीन अपडेटनुसार, आता मोफत अकाउंट्सवरून दिवसाला केल्या जाणाऱ्या पोस्ट आणि रिप्लायच्या मर्यादेत प्रचंड कपात करण्यात आली आहे.
नवीन मर्यादा काय आहेत?
नवीन नियमांनुसार, आता फ्री युजर्स दिवसाला फक्त 50 पोस्ट आणि 200 रिप्लाय करू शकणार आहेत. याआधी ही मर्यादा दररोज तब्बल 2,400 पोस्ट किंवा रीपोस्ट इतकी होती. मात्र अचानक या पोस्टच्या संख्य़ेत घट करण्यात आली. या बदलाबाबत स्पष्टीकरण देताना कंपनीने म्हटले आहे की, “बॅकएंडवरील ताण कमी करण्यासाठी आणि एरर पेजेस किंवा डाऊनटाईमची समस्या टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जर तुम्ही दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त पोस्ट करण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला स्क्रीनवर ‘एरर मेसेज’ दिसेल.
इतर नियमांमध्ये काय बदल?
अकाउंटशी संबंधित इतर तांत्रिक मर्यादा मात्र पूर्वीसारख्याच राहतील. युजर्स अजूनही दिवसाला 500 पर्यंत डायरेक्ट मेसेज (DMs) पाठवू शकतात. तसेच तासाला 4 वेळा अकाउंटचा ईमेल आयडी बदलू शकतात. याव्यतिरीक्त दिवसाला 400 नवीन अकाउंट्सना फॉलो करू शकतात.
प्रीमियम सबस्क्रिप्शन हाच एकमेव पर्याय?
जर तुम्हाला 50 पेक्षा जास्त पोस्ट करायच्या असतील, तर तुम्हाला ‘X’ च्या प्रीमियम प्लॅन्सपैकी एक सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. ‘X’ कडे सध्या तीन प्रीमियम प्लॅन्स उपलब्ध आहेत. हे प्लॅन्स घेतल्यास पोस्टमधील अक्षरांची मर्यादा (Character Limit) 280 वरून थेट 25,000 पर्यंत वाढते, ज्यामुळे युजर्स कमी पोस्टमध्ये जास्त मजकूर लिहू शकतील.
हे आहेत ‘X’ चे सध्याचे प्लॅन्स
1. बेसिक : 3 डॉलर (280 रू) प्रति महिना किंवा 32 डॉलर (3,063 रूपये) प्रति वर्ष
2. प्रीमियम (Premium): 8 डॉलर (765 रूपये) प्रति महिना किंवा 84 डॉलर प्रति वर्ष. यामध्ये अकाउंटला ‘ब्लू टिक’ मिळते आणि जाहिरातीही कमी दिसतात.
3. प्रीमियम+ (Premium+): 40 डॉलर (3,828 रूपये) प्रति महिना किंवा 395 डॉलर प्रति वर्ष. यामध्ये युजर्सना एकही जाहिरात दिसत नाही. तसेच प्रीमियम आणि प्रीमियम+ प्लॅन्समध्ये ‘Grok AI’ वापरण्याची मर्यादाही जास्त मिळते.































































