डी.के.शिवकुमार यांना धक्का, शपथविधीनंतर दोन दिवसातच मंत्र्याचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तार होऊन दोन दिवसच झालेले असताना काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. इच्छित खातं न मिळाल्याने नाराज झालेले ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळात आपल्याला ‘बंगळुरू विकास’ (Bengaluru Development) हे खाते नाकारल्यामुळे रेड्डी अत्यंत नाराज होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

कॅमेऱ्यासमोर आपल्या राजीनामा पत्रावर स्वाक्षरी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना रामलिंगा रेड्डी म्हणाले, “मला बंगळुरू विकास खाते दिले जाईल, असे दोनदा सांगण्यात आले होते. पण आता माझी निराशा झाली आहे. म्हणूनच मी मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे.”

रेड्डी यांनी दावा केला की, “डी. के. शिवकुमार स्वतः माझ्या घरी आले होते आणि म्हणाले होते की, मुख्यमंत्री झाल्यावर मी बंगळुरू विकास हे खाते सोडेन आणि ते तुम्ही सांभाळा. इतकेच नाही तर शपथविधीच्या आदल्या दिवशीही माझी शिवकुमार यांच्याशी भेट झाली होती, तेव्हाही त्यांनी हे खाते मलाच दिले जाईल असे आश्वासन दिले होते.”

तथापि, आपण केवळ मंत्रिपदाचा राजीनामा देत असून आमदार म्हणून काम करत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आपण डी. के. शिवकुमार किंवा माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर वैयक्तिकरित्या नाराज नसल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

जलसंपदा खाते मिळाल्याने नाराजी नाट्य
आठ वेळा आमदार राहिलेल्या रामलिंगा रेड्डी यांनी ‘बंगळुरू विकास’ खात्याव्यतिरिक्त इतर कोणतेही मंत्रालय स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला होता. परंतु, त्यांना ‘मोठे आणि मध्यम जलसंपदा’ (Major and Medium Irrigation) खाते वाटप करण्यात आले. यामुळेच कर्नाटक सरकारमध्ये हे मोठे नाट्य रंगले असून अंतर्गत चर्चेला उधाण आले आहे.