
दक्षिणात्य सुपरस्टार राम चरणचा बहुप्रतिक्षित ‘पेड्डी’ हा चित्रपट अखेर मोठ्या पडद्यावर दाखल झाला असून, प्रदर्शनापूर्वीच त्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. ट्रेलर, गाणी आणि दमदार प्रचार मोहिमेमुळे चर्चेत राहिलेल्या या चित्रपटाकडून बॉक्स ऑफिसवर मोठी सुरुवात होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. चित्रपट व्यापार विश्लेषकांच्या अंदाजानुसार, ‘पेड्डी’ पहिल्याच दिवशी देशभरात 58 ते 63 कोटी रुपयांची कमाई करू शकतो. हा आकडा गाठल्यास राम चरणच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या सोलो ओपनिंगचा मान या चित्रपटाला मिळू शकतो. त्यामुळे चाहत्यांचे आणि चित्रपटसृष्टीचे लक्ष आता पहिल्या दिवसाच्या अधिकृत कमाईच्या आकडेवारीकडे लागले आहे.
विशेष म्हणजे, राम चरणचा मागील चित्रपट ‘गेम चेंजर’ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी सुमारे 51 कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र, ‘पेड्डी’ला मिळत असलेला प्रतिसाद आणि आगाऊ बुकिंगचा वेग पाहता हा विक्रम मोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘गेम चेंजर’ला अपेक्षित यश न मिळाल्यानंतर राम चरणच्या चाहत्यांना त्याच्या दमदार पुनरागमनाची प्रतीक्षा होती. ‘पेड्डी’ हा स्पोर्ट्स आणि ॲक्शनचा संगम असलेला चित्रपट असल्याने त्याला तेलुगू प्रेक्षकांकडून विशेष प्रतिसाद मिळत आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील आगाऊ बुकिंगची आकडेवारीही उत्साहवर्धक असल्याचे सांगितले जात आहे. असे वृ्त्त एबीपी न्यूज ने दिले आहे.
दरम्यान, ‘पेड्डी’ हा मोठ्या बजेटमध्ये तयार झालेला चित्रपट आहे. विविध माध्यमांतील वृत्तांनुसार, चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुमारे 350 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. चित्रपटात राम चरणसोबत जान्हवी कपूर, शिव राजकुमार आणि बोमन इराणी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन बुची बाबू सना यांनी केले आहे. राम चरणच्या कारकिर्दीत नवा विक्रम प्रस्थापित करतो का, याकडे संपूर्ण चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.


























































