
फुटबॉल वर्ल्ड कप म्हणजे फक्त गोल, ट्रॉफी आणि जल्लोष नव्हे. तो मानवी भावनांचा, स्वप्नांचा आणि नातेसंबंधांचा महोत्सव असतो. यंदाच्या 48 संघांच्या महासंग्रामात अशी एक वेगळीच कथा रंगणार आहे. ते मैदानावर एकमेकांचे प्रतिस्पर्धी असतील, पण रक्ताच्या नात्याने ते भाऊ असतील. भावंडांची ही अनोखी लढाई फुटबॉलमध्ये नव्या समीकरणाची नांदी असेल.
आजवर फुटबॉलच्या इतिहासात अनेक भावंडांनी एकाच देशासाठी खेळून नाव कमावलेय. मात्र यंदा काही भावंडे वेगवेगळ्या राष्ट्रांच्या जर्सीतून मैदानात उतरणार आहेत. घरातील भिंती एकच, बालपणीचा चेंडू एकच, पण आता स्वप्नांचे रंग वेगळे आहेत.
डोऊ बंधू- फ्रान्समध्ये जन्म, दोन देशांचे प्रतिनिधी
या कथेत सर्वप्रथम नाव येते डोऊ बंधूंचे. फ्रान्समध्ये जन्मलेले दोघे भाऊ आता दोन वेगळ्या राष्ट्रांसाठी खेळणार आहेत. धाकटा डिझायर डोऊ फ्रान्सच्या बलाढय़ संघाचा भाग आहे, तर मोठा गुएला डोऊ वडिलांची मातृभूमी असलेल्या आयव्हरी कोस्टसाठी खेळताना दिसेल.एकाच घरात वाढलेले हे दोघे भाऊ आता विश्वचषकाच्या रंगमंचावर वेगवेगळ्या राष्ट्रगीतांसाठी उभे राहतील. त्यामुळे फुटबॉलपेक्षा मोठी भावनिक पटकथा दुसरी कोणती असू शकते?
विलियम्स बंधू – एक स्पेनचा तर दुसरा घानाचा
स्पेनच्या बास्क प्रदेशात वाढलेल्या विलियम्स बंधूंची कहाणीही तितकीच रंजक आहे. धाकटा निको विलियम्स आज स्पेनच्या आक्रमणाचा चेहरा बनलाय. युरो चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध चमकदार कामगिरी करत त्याने सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब पटकावला होता. पण त्याचा मोठा भाऊ इनाकी विलियम्सने वेगळी वाट निवडली. स्पेनसाठी एक मैत्री सामना खेळल्यानंतर त्याने घानाचे प्रतिनिधित्व करण्याचा निर्णय घेतला. एका भावाच्या हृदयात स्पेन धडकते, तर दुसऱयाच्या घानाचे ठोके घुमतात.
एक आई, दोन देश; लुकासेन-ब्रोबींची अनोखी गोष्ट
घानाच्या संघातील डेरिक लुकासेन आणि नेदरलॅण्ड्सच्या संघातील ब्रायन ब्रोबी यांची कथा तर आणखी वेगळी आहे. दोघांची आई एकच, पण वडील वेगळे. एक जण घानाच्या बचावफळीत भक्कम भिंत उभारतो, तर दुसरा नेदरलॅण्ड्सच्या आक्रमणात गोलची शिकार करतो. विश्वचषकच्या रणभूमीवर दोघे वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधित्व करत असले, तरी त्यांच्या रक्तातील नातं कायम आहे.
साउथार बंधू – स्कॉटलंडमध्ये जन्म, पण दोन खंडांचे खेळाडू
चौथी जोडी आहे हॅरी आणि जॉन साउथार यांची. स्कॉटलंडमधील अबरडीन येथे जन्मलेले हे भाऊ आता दोन वेगवेगळ्या फुटबॉल संस्कृतींचे प्रतिनिधित्व करतात. 27 वर्षीय हॅरी साउथार ऑस्ट्रेलियासाठी खेळतो. त्याच्या आईची मुळे ऑस्ट्रेलियात असल्याने त्याने सात वर्षांपूर्वी कांगारूंची जर्सी स्वीकारली. विशेष म्हणजे त्याआधी तो युवा स्तरावर स्कॉटलंडचे प्रतिनिधित्व करत होता. दुसरीकडे मोठा भाऊ जॉन मात्र स्कॉटलंडशीच निष्ठावान राहिला.





























































