FIFA World Cup 2026 – वर्ल्ड कपचा रस्ता आता वाळवंटातून जातोय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एक काळ होता, अरब देश म्हटलं की वर्ल्ड कपमध्ये यायचं, तीन सामने खेळायचे, एखादा गोल झाला तर आनंद मानायचा आणि ‘शुक्रन’ म्हणत विमान पकडायचं. फुटबॉलच्या मेजवानीत त्यांची भूमिका लग्नातल्या दूरच्या नातेवाईकासारखी होती. यायचं, जेवायचं आणि शांतपणे निघून जायचं. पण साहेब, आता गोष्ट बदललीय. एवढी बदललीय की, युरोपियन फुटबॉलच्या राजवाड्याच्या खिडक्या थरथरायला लागल्याहेत.

एकेकाळी वाळवंटात उंट धावायचे. आज तिथे रोनाल्डो धावतो. नेमार धावतो. बेन्झेमा धावतो. आणि हे सगळे पर्यटक म्हणून नाही, तर पगाराच्या चेकवर स्वाक्षरी करायला आणि फुटबॉल खेळायला आलेत. यंदाच्या विश्वचषकात तब्बल आठ अरब देश खेळत आहेत. सौदी अरब, कतार, मोरोक्को, इजिप्त, टय़ुनिशिया, अल्जेरिया, इराक आणि पहिल्यांदाच जॉर्डन (एक महत्त्वाचं म्हणजे इराण हा अरब नव्हे तर पर्शियन देश आहे). हा आकडा फक्त आकडा नाही. तो फुटबॉलच्या सत्तांतराचा पहिला जाहीरनामा आहे.

2022 मध्ये कतारने वर्ल्ड कप भरवला. अनेकांनी टीका केली. पण स्पर्धा संपल्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. त्याच स्पर्धेत सौदी अरबने अर्जेंटिनाला हरवून असा धक्का दिला की, मेस्सीच्या चाहत्यांचा चहा थंड झाला. आणि मोरोक्को? त्याने तर सरळ इतिहासाच्या पुस्तकात घुसखोरी केली. स्पेनला बाहेर फेकलं, पोर्तुगालला घरी पाठवलं आणि रोनाल्डोच्या डोळ्यात अश्रू आणले. मोरोक्को म्हणाला, आम्ही फक्त वाळवंटातून आलोय, वाळूत खेळून नाही.

आज सौदी लीगमध्ये रोनाल्डो, नेमार, बेन्झेमा यांच्यासारखे स्टार्स खेळत आहेत. त्यांचे पगार ऐकले की काही देशांचे अर्थमंत्रीही बजेट पुन्हा तपासतील. कतारकडे पीएसजी आहे, अबुधाबीच्या शेखांकडे मँचेस्टर सिटी आहे. म्हणजे युरोपियन फुटबॉलचा चेंडू आता अरबांच्या पायात आहे आणि त्याची हवा त्यांच्या पैशातून भरली जातेय. पण ही गोष्ट फक्त पैशाची नाही. अरबांनी फुटबॉलची संपूर्ण प्रयोगशाळाच उभारली आहे. त्यांनी खेळाडू नाही तर भविष्य विकत घेतलंय.

यंदा जॉर्डन पहिल्यांदाच विश्वचषकात आलाय. इराक तब्बल चार दशकांनंतर परतलाय. मोरोक्कोच्या डोळ्यांत पुन्हा एकदा उपांत्य फेरीपेक्षाही मोठं स्वप्न चमकतंय. उद्या एखादा अरब संघ पुन्हा सेमीफायनलमध्ये दिसला तर तो धक्का नसेल, ती घोषणा असेल. फुटबॉलचा इतिहास सांगतो, पैसा ट्रॉफी जिंकू शकत नाही, पण पैसा स्वप्नांना रन वे देतो. अरबांनी तो रन वे तयार केलाय.

एक गोष्ट मात्र नक्की. फुटबॉलच्या आकाशात अरबांचा चंद्र आता उगवलेला नाही, तो वाढतोय आणि पौर्णिमा जवळ आली की जगाला प्रकाश सहन करावा लागतो. म्हणूनच सावधान फुटबॉल महासत्तांनो, वर्ल्ड कपचा रस्ता आता हा वाळवंटातून जातोय. हे कुणीही नाकारू शकणार नाही. उद्याचा विश्वविजेता युरोपच्या हिरवळीवर जन्मलेला असेलच असं नाही. तो कदाचित वाळवंटात वाढलेला असेल. कारण दुनिया गोल आहे… आणि फुटबॉलमध्ये गोल कुणीही करू शकतो!