
हिंदुस्थान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना धरमशाला येथे खेळवला जात आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना उशिरा सुरू झाला. त्यामुळे सामना 25-25 षटकांचा करण्यात आला असून टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने सर्वबाद 194 धावा केल्या असून टीम इंडियाला जिंकण्यासाठी 195 धावांचे आव्हान दिले आहे.
दरम्यान, या सामन्याद्वारे टीम इंडियामध्ये दोन नव्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. यामध्ये IPL 2026 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या हर्ष दुबेचा आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या गुरनूर ब्रार या वेगवान गोलंदाजाचा समावेश आहे. तीन वर्षांनी यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे. या सामन्यात हर्ष दुबे आणि गुरनूर ब्रार दोघांनीही मिळालेल्या संधीचं सोन करत आपल्या धारधार गोलंदाजीने अफगाणिस्तानच्या फलंदाजांची तारांबळ उडवली. दोघांनीही आपल्या पहिल्याच सामन्यात 3-3 विकेट कारकिर्दीची धडाकेबाज सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानकडून रहमानुल्ला गुरबाजने एकट्याने खिंड लढवात 51 चेंडूंमध्ये 8 षटकार आणि 8 चौकारांच्या जोरावर 102 धावांची शतकीय खेळी केली. हर्ष दुबे आणि गुरनूर ब्राल यांच्याव्यतिरिक्त अर्शदिप सिंग आणि नितीश कुमार रेड्डी यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.
विदर्भाकडून खेळणाऱ्या हर्ष दुबे या फिरकी अष्टपैलू खेळाडूने लिस्ट-ए क्रिकेटच्या ३० सामन्यांत ३१ बळी घेतले असून, बॅटिंगमध्ये दोन अर्धशतकांसह २९६ धावा केल्या आहेत. दुसरीकडे, पंजाबचा वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार गेल्या काही काळापासून भारतीय संघासोबत होता, पण त्याला आता खेळण्याची संधी मिळाली आहे. गुरनूरने ९ लिस्ट-ए सामन्यांत १२ बळी घेतले आहेत. भारतीय कर्णधार शुभमन गिलने सांगितले की, आगामी वर्ल्ड कपपूर्वी संघ १५-२० वनडे सामने खेळणार असून, या मालिकेचा मुख्य उद्देश वेगवेगळे कॉम्बिनेशन अजमावणे आणि संघाची ताकद समजून घेणे हा आहे.





























































