
अन्न व औषध प्रशासनाने गेल्या दोन दिवसांत राज्यातील विविध ठिकाणी 50 ठिकाणी धाडी टाकल्या. यावेळी विविध आस्थापनांची तपासणी करून कोटय़वधी रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला. तसेच गुटख्याची वाहतूक व विक्री केल्याप्रकरणी 17 जणांना अटक करून आठ आस्थापना सील तर तीन वाहने जप्त करण्यात आली.
गुटखा विक्रेते, बेकायदेशीर अन्न पदार्थांचा कारभार करणाऱयांविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने जोरदार मोहीम उघडली आहे. 25 मेपासून दररोज राज्यात कुठे न कुठे धडक कारवाया केल्या जात आहेत. 11 व 12 जून या दोन दिवसांतदेखील राज्यातील 50 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. यावेळी कोटय़वधी रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा तसेच अन्न साठा जप्त करण्यात आला.
…तर कठोर कारवाई करणार
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील दूध, दुग्धजन्य उत्पादक व प्रक्रिया करणाऱया व्यावसायिकांची बैठक घेतली. यावेळी दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ खपवून घेतली जाणार नाही. कोणताही अन्न व्यावसायिक कमी दर्जाचे, असुरक्षित दर्जाचे दुधाची विक्री, वितरण, उत्पादन करताना आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा देण्यात आला.























































