डोंगर कापणाऱ्या खनिज माफियांना धडा शिकवणार; नियम धाब्यावरबसवून उत्खनन केल्यास जागेवरच दंड वसूल, कोकण विभागीय आयुक्तांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महसूल बुडवून बेकायदा गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांविरोधात कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बेकायदा उत्खनन, परवानगीपेक्षा अधिक उपसा आणि दंडाची चुकवेगिरी करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी ठाणे जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे नियम धाब्यावर बसवून डोंगर कापणाऱ्या गौण खनिजमालकांचे धाबे दणाणले आहेत.

विभागीय आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच ठाणे दौऱ्यावर आलेल्या अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी, निवासी जिल्हाधिकारी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत ठाणे जिल्ह्यातील बेकायदा गौण खनिज उत्खननावर त्यांनी प्रशासनाला कडक सूचना केल्या.

विनापरवाना उत्खनन, मंजूर मर्यादेपेक्षा अधिक उपसा करून शासनाचा महसूल बुडविण्याच्या तक्रारी गंभीर असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. यावर अशा प्रकरणांवर सातत्याने लक्ष ठेवून दोषींवर तत्काळ कारवाई करावी, दंडाची प्रभावी वसुली करावी आणि कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश अग्रवाल यांनी दिले. बेकायदा उत्खनन करणाऱ्यांना शोधून काढण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून महसूल बुडविणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थी-पालकांची अडवणूक होणार नाही

दौऱ्यादरम्यान अग्रवाल यांनी ‘आपले सरकार’ सेवा केंद्रालाही भेट दिली. विविध दाखल्यांसाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांनी सेवा वितरणाची माहिती घेतली. शाळा आणि महाविद्यालयांच्या प्रवेशप्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना आणि पालकांना दाखल्यांसाठी अडवणूक होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच सर्व दाखले वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने देण्याच्या सुचनाही करण्यात आल्या.