
अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिरातून तब्बल 200 कोटी रुपयांची देणगी चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावरून समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजप सरकावर निशाणा साधला आहे. भाजपसाठी धर्माचा अर्थ फक्त पैसा (धन) असा आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपवर टीका केली.
समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार अखिलेश यादव यांनी बुधवारी लखनौ येथील पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला. अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरीच्या प्रकरणावर बोलताना अखिलेश यादव म्हणाले की, भाजपसाठी धर्माचा अर्थ फक्त पैसा असा आहे.
सीसीटीव्ही गायब होण्यावरून टोला
अयोध्या प्रकरणावर चिमटा काढत अखिलेश यादव म्हणाले की, “ज्या ज्या ठिकाणी निवडणुकांमध्ये फेरफार झाली होती, तिथे सीसीटीव्ही मिळाले नव्हते आणि इथेही सीसीटीव्ही फुटेज गायब झाले आहेत.” ते पुढे म्हणाले की, सीसीटीव्हीमधील ‘सीसी’चे रहस्य आता उघड होईल, ज्याचा अर्थ ‘चढ़ावा चोरी’ आणि ‘चंदा चोरी’ असा आहे.

























































