
बोकडामुळे बनावट रिक्षाचा पर्दाफाश करण्यात ठाणे वाहतूक शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. तीन हात नाका येथे एक गलेलठ्ठ बोकड घेऊन जाणाऱ्या रिक्षावर पोलिसांनी ऑनलाइन दंड आकारला. हा ऑनलाइन दंड मूळ रिक्षाचालकाकडे गेल्याने तातडीने तो घटनास्थळी पोहोचला आणि एकाच नंबरच्या दोन रिक्षांचा कारनामा समोर आला. हा बनाव लक्षात येताच पोलिसांनी बनावट रिक्षा जप्त करून रिक्षाचालकाविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
तीन हात नाका सिग्नल येथे १५ जून रोजी दुपारी नौपाडा वाहतूक पोलीस निरीक्षक गौरी मोरे या पथकासमवेत दैनंदिन वाहतूक नियमन करत होत्या. दरम्यान घोडबंदर रोड दिशेकडील वाहिनीवर वाहतूककोंडी झाल्याने पथकातील पोलीस नाईक जितेंद्र पाटील, पोलीस हवालदार अभिजित भाट, चालक पोलीस शिपाई स्वानंद माने वाहतूककोंडी सोडवण्यासाठी गेले होते. तेव्हा, रिक्षामधून (एमएच ०४ एचझेड ४२९०) प्रवाशांऐवजी बेकायदेशीरपणे बोकड नेत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार सदर रिक्षाचालकावर ई चलानची कारवाई करण्यात आली.
ऑनलाइन दंड ठोठावताच काही वेळात मुंब्रा येथून एक रिक्षाचालक आपली रिक्षा घेऊन घटनास्थळी आला. आपली रिक्षा मुंब्रा येथे असताना मला दंड कसा काय आला, अशी विचारपूस त्याने केली. त्यामुळे कारवाई करण्यात आलेली रिक्षा बनावट असल्याचे निष्पन्न झाले. अशी माहिती वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.




























































