
बेंगळुरूमध्ये खाकी वर्दीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील मडीवाला भागातील एका हॉटेलमध्ये बनावट पोलीस बनून आलेल्या टोळीने केरळमच्या दोन तरुणांना 20 लाख रुपयांना लुटल्याची घटना गुरुवारी घडली होती. या 20 लाख रुपयांच्या दरोड्याचा मुख्य सूत्रधार दुसरा कोणी नसून गुन्हे अन्वेषण विभागाचा (CID) एक पोलीस निरीक्षकच असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी मडीवाला पोलिसांनी सीआयडी पोलीस निरीक्षक महेश कनकागिरी याच्यासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली असून लुटलेली सर्व रोकड जप्त करण्यात आली आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, कुपेंद्र रेड्डी आणि वसंत कुमार अशी अटक करण्यात आलेल्या इतर दोन आरोपींची नावे आहेत. या आरोपींच्या चौकशीतून पोलीस निरीक्षक महेश कनकागिरी याचे नाव समोर आले आणि पोलिसांनी तातडीने कारवाई करत सीआयडी पोलीस निरीक्षकाला बेड्या ठोकल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमचे दोन तरुण मडीवाला येथील एका हॉटेलमध्ये मुक्कामास होते. त्यांच्याकडे 20 लाख रुपयांची रोकड होती. आरोपींनी या तरुणांना जाळ्यात ओढण्यासाठी आधीच कट रचला होता. गुरुवारी ही टोळी हॉटेलमध्ये पोहोचली. त्यांनी स्वतः पोलीस असल्याचे सांगत तरुणांना बनावट ओळखपत्रे दाखवली. “तुमचा पैशांच्या बेकायदेशीर व्यवहारात सहभाग आहे,” असा संशय व्यक्त करत आरोपींनी तरुणांची उलटतपासणी सुरू केली. त्यानंतर तरुणांना मारहाण करत त्यांच्याकडील 20 लाख रुपयांची रोकड जप्त करत असल्याचा बहाणा केला. हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या एका जीपमधून हे आरोपी पैसे घेऊन पसार झाले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित तरुणांनी तातडीने मडीवाला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. मडीवाला पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर वेगाने चक्रे फिरवून आधी कुपेंद्र आणि वसंत यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुख्य सूत्रधार पोलीस निरीक्षक महेश कनकागिरी याला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडा टाकलेली 20 लाख रुपयांची संपूर्ण रक्कम हस्तगत करण्यात आली असून, या गुन्ह्यात आणखी काही जणांचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. एका सेवारत पोलीस अधिकाऱ्यानेच दरोड्याचा कट रचल्याने कर्नाटक पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.





























































