
दिल्ली आणि एनसीआर परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास हवामानात अचानक मोठा बदल झाला. अनेक भागात अचानक जोरदार धुळीचे वादळ आले आणि त्यानंतर विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यामुळे दिल्लीत तापमानाचा पारा घसरला असून, गेल्या काही दिवसांपासून भीषण उकाडा आणि उष्णतेच्या लाटेचा सामना करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र या खराब हवामानाचा फटका दिल्ली विमानतळावरील हवाई वाहतुकीला बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारच्या सुमारास दिल्लीतील छतरपूर, आरके पुरम, कर्तव्य पथ, आरएमएल रुग्णालय, गुरुद्वारा बंगला साहिब, मौलाना आझाद रोड, बाराखंभा रोड आणि इंडिया गेट या प्रमुख भागात धुळीचे वादळ पाहायला मिळाले. दिल्लीव्यतिरिक्त उत्तर प्रदेशातील नोएडा आणि लगतच्या एनसीआर भागातही हेच चित्र होते. अचानक आलेल्या या वादळामुळे आणि पावसामुळे जनजीवन काही काळासाठी विस्कळीत झाले होते.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस तर किमान तापमान २७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. तसेच हवेतील आर्द्रता ७३ टक्के इतकी नोंदवली गेली. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
विमान उड्डाणांवर परिणाम
खराब हवामानाचा थेट परिणाम इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाणांवर झाला आहे. विमानतळ प्रशासनाने याबाबत माहिती देताना सांगितले की, “खराब हवामानामुळे विमानसेवेवर परिणाम झाला आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आमचे पथक काम करत आहे. मात्र, संभाव्य विलंब टाळण्यासाठी प्रवाशांनी विमानतळावर पोहोचण्यासाठी दिल्ली मेट्रोसारख्या पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा.” तसेच, प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी आपापल्या एअरलाइन्सकडून फ्लाइटच्या वेळा तपासून घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.





























































