
महाराष्ट्रातील वीजदर सध्या देशातील इतर अनेक राज्यांच्या तुलनेत स्पर्धात्मक असून 2029-30 पर्यंत ते आणखी कमी होतील. देशातील सर्वात कमी वीजदर असलेल्या राज्यांत महाराष्ट्राचे नाव असेल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. 2029-30 पर्यंत वीजदर 7.43 रुपये प्रति युनिटपर्यंत खाली येण्याचा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.
राज्यातील औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांसाठी वीज विक्री दरामध्ये वाढ केल्याबाबत सजेज ऊर्फ बंटी पाटील यांनी तारांकित प्रश्न मांडला. एकीकडे पेंद्र सरकारकडून सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन दिले जात असताना राज्य सरकारने औद्योगिक, व्यावसायिक व सौर ऊर्जा वापरकर्त्यांवर ग्रीड सपोर्ट चार्ज, वीज विक्री करवाढ केल्याचा मुद्दा त्यांनी मांडला असता मुख्यमंत्र्यांनी त्यावर उत्तर देताना ग्रीड सपोर्ट चार्ज हा सामान्य ग्राहकांच्या हितासाठी लागू करण्यात आल्याचे स्पष्ट केले. सौर ऊर्जेचा वाढता वापर आणि त्यातून ग्रीडवर येणारा ताण यामुळे वीज वितरण व्यवस्थेचा खर्च वाढत आहे. हा खर्च सर्वसामान्य ग्राहकांऐवजी अतिरिक्त लाभ घेणाऱया घटकांकडून वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.





























































