ईपीएफओची वेबसाइट आजपासून तीन दिवस बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लग्नासाठी, शिक्षणासाठी किंवा अन्य कामासाठी पीएफ काढणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुढचे तीन दिवस पीएफ काढता येणार नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) आपली डिजिटल प्रणाली अद्ययावत करत आहे. या कामामुळे संकेतस्थळाच्या मुख्य सेवा 26 ते 28 जून 2026 पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवल्या जाणार आहेत. त्यामुळे पीएफ काढणे, आगाऊ रक्कम किंवा अन्य कोणतीही कामे रखडली जाणार आहेत.

26 जून मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 28 जून 2026 रोजी रात्री 11ः59 पर्यंत या सेवा उपलब्ध नसतील. या प्रक्रियेदरम्यान सदस्य नवीन दावे दाखल करणे किंवा दावा प्रक्रिया सेवांचा लाभ घेऊ शकणार नाहीत. डिजिटल प्रणाली अद्ययावत करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर, 29 जूनपासून सर्व सेवा पुन्हा सुरळीत होतील. पोर्टल बंद असताना सदस्य ईपीएफओ उमंग ऍप, मेसेज, व्हॉट्सऍप आणि मिस्ड कॉलद्वारे खात्याची माहिती मिळवू शकतात. ज्या सदस्यांना तातडीने पीएफ काढण्याची किंवा इतर दाव्यांची आवश्यकता आहे, त्यांनी 28 जूननंतर आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.