
पोलीस असल्याचे भासवून चौकशीच्या नावाखाली सोने व्यावसायिकाला वाहनात बसून त्याच्याकडून 13 लाखांचे सोने आणि पैसे घेऊन पळून गेल्याप्रकरणी एकाला मेघवाडी पोलिसांनी अटक केली. कार्तिक शेखर नाडर असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन जण पळून गेले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
तक्रारदार हे सोने व्यापारी आहेत. गेल्या आठवड्यात ते दुकान बंद करून घरी जात होते. तेव्हा तिघांनी त्यांना रस्त्यात अडवले. गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे भासवले. चौकशी करायची आहे असे सांगून एका वाहनात बसवले. वाहनात बसवल्यानंतर त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवला. त्यांच्याकडील सोने आणि पैसे घेऊन ते पळून गेले. घडल्याप्रकरणी त्याने मेघवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा नोंद केला. तपासादरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्हीही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी कार्तिकला ताब्यात घेऊन अटक केली.






























































