
पेपरफुटी आणि राम मंदिर देणगी घोटाळ्यामुळे टीकेच्या रडारवर असताना आता मोदी मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा नवा प्रताप समोर आला आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री भगीरथ चौधरी यांनी स्वतःच्याच खात्याकडून 99 लाखांचे अनुदान मिळवण्याची कमाल केली आहे. काकडीच्या शेतीसाठी त्यांना हे अनुदान मिळाले आहे.
फलोत्पादनाच्या माध्यमातून बागायती शेतीच्या व्यावसायिक विकासासाठी राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ अनुदान देते. 2025 साली या योजनेअंतर्गत 467 शेती प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली होती. यात चौधरी यांच्या 16,592 चौरस मीटरवरील शेतीचा समावेश आहे. चौधरी यांच्या कृषी प्रकल्पाची एकूण किंमत 1.99 कोटी रुपये होती. त्यांनी एचडीएफसी बँकेकडून दीड कोटींचे कर्ज घेतले होते. मार्च 2026 साली अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर काही आठवडय़ांतच 99 लाख रुपयांचे अनुदान भगीरथ चौधरी यांच्या एचडीएफसीच्या कर्ज खात्यावर जमा झाले.
मी काहीही लपवले नाही; मंत्रिमहोदयांचा खुलासा
अनुदानावरून होणाऱया चर्चेवर चौधरी यांनी आज प्रतिक्रिया दिली. ‘मी एक शेतकरी आहे. लहानपणापासून आम्ही शेतीच्या व्यवसायात आहोत. हजारो शेतकऱयांना ज्या नियमांनुसार आणि निकषांनुसार अनुदान मिळाले आहे, त्यानुसारच मला हे अनुदान मिळाले आहे. मी काहीही लपवलेले नाही’, असा खुलासा त्यांनी केला.
फलकामुळे पोलखोल
भगीरथ चौधरी यांची राजस्थानच्या अजमेर येथील पीहमध्ये विस्तीर्ण शेती आहे. येथे कृत्रिम तलाव आणि चार मोठे पॉलिहाऊस आहेत. या शेतीच्या बाजूला एक पाटी लावण्यात आली आहे. राष्ट्रीय फलोत्पादन बोर्ड, कृषी मंत्रालय, भारत सरकारद्वारा सहाय्यता प्राप्त असे त्यावर लिहिण्यात आले आहे. त्यावर अनुदानाची रक्कम 99,60,000 रुपये नमूद करण्यात आली असून लाभार्थी म्हणून भगीरथ चौधरी यांचे नाव आहे.
तुम्हीही खा, मलाही द्या! काँग्रेसचा हल्ला
काँग्रेसने या मुद्दय़ावरून मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. ‘हा सरळसरळ पदाचा दुरुपयोग आहे. मंत्री बनून लोकांचे पैसे लुटले जात आहेत. नरेंद्र मोदींनी आपल्या मंत्र्यांना खुली सूट देऊन ठेवली आहे. तुम्हीही खा, मलाही द्या असा हा संदेश आहे, अशी टीका काँग्रेसने ‘एक्स’च्या माध्यमातून केली आहे. चौधरी यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.




























































