
राज्यात अल्पवयीन मुलांमधील गुन्हेगारी वाढली असून गुन्हेगारी टोळ्यांकडून त्यांचा गैरवापर केला जात आहे. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासांत हा मुद्दा चर्चेला आला. अशा घटनांबद्दल आमदारांनी गंभीर चिंता व्यक्त केली. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, अल्पवयीन बालकांचा गुन्ह्यासाठी वापर करणाऱ्या मास्टरमाइंडला मकोका लावणार, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली.
आमदार अर्जुन खोतकर यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून जालनात वाढलेल्या गुन्हेगारीचा मुद्दा उपस्थित केला होता. जालनात गेल्या चार महिन्यांत खुनाच्या 17 घटना घडल्या आणि त्यातील आठ घटनांमध्ये अल्पवयीन गुन्हेगारांचा सहभाग आढळून आला आहे. अल्पवयीन बालकांचा गुन्हेगारी टोळ्यांकडून वाळू तस्करी, दारू विक्री, ड्रग्ज विक्रीसाठी वापर केला जात असल्याचे खोतकर म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या चर्चेला उत्तर देताना सांगितले की, अल्पवयीन गुन्हेगारांना वेगळ्या कायद्यांनुसार शिक्षा द्यावी लागते. अनेकदा अटक झाल्यानंतर त्यांना जामिनावर सोडावे लागते. याचा फायदा घेऊन त्यांच्याकडून गुन्हे करून घेण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. त्यामुळे हे कायदे अधिक कठोर करण्याची गरज आहे. बालकांना गुन्हेगारीला प्रवृत्त करतील किंवा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे त्यांचा वापर करतील त्यांच्या शिक्षेत वाढ केली जाईल.
बालगुन्हेगारांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती
यावेळी झालेल्या चर्चेत सहभागी होताना भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही राज्यातील वाढत्या बाल गुन्हेगारीवर बोट ठेवले. 12 वर्षांच्या मुलाने 21 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या घटनेचा दाखला देत त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. तसेच या घटना रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी त्यांनी केली. जर 12 व्या वर्षी एखादा मुलगा बलात्कार करत असेल, 13-14 व्या वर्षी दारूसाठी वडिलांच्या डोक्यावर कुऱहाड मारत असेल तर माणुसकी किंवा तो बालक आहे हे पाहून आपल्याला त्याला सोडता येणार नाही. त्यामुळे या सगळ्याचे शास्त्रशुद्ध विश्लेषण करण्याची गरज आहे, असे मत मुनगंटीवार यांनी मांडले. त्यावर या संपूर्ण प्रकाराचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. बाल गुन्हेगारांची वयोमर्यादा 18 वरून 16 वर्षे करण्याचा प्रस्ताव पेंद्र शासनाकडे पाठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.




























































