अमेरिकेकडून ‘दिवाळी’ सणाचा गौरव, विशेष टपाल तिकीट जारी होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका यावर्षी दिवाळीनिमित्त खास पोस्टाचे तिकीट प्रकाशित करणार आहे. अमेरिकेने घेतलेल्या या निर्णायाचे सर्वच हिंदुस्थानी वंशांच्या नागरिकांनी स्वागत केले आहे. अमेरिकेच्या टपाल सेवेने (USPS) यंदाच्या वर्षाच्या अखेरीस जारी करण्यात येणाऱ्या आपल्या विशेष टपाल तिकिटांच्या मालिकेत हिंदुस्थानचा प्रमुख सण असलेल्या ‘दिवाळी’चा समावेश केला आहे. या विशेष तिकिटाचे अनावरणही केले आहे. या दिवाळी टपाल तिकिटावर ह्युस्टन येथे राहणाऱ्या हिंदुस्थानी वंशाच्या कलाकार संगीता भुतडा यांनी साकारलेली एक अत्यंत सुबक आणि आकर्षक रांगोळी डिझाईन पाहायला मिळणार आहे. या सुंदर रांगोळीचे छायाचित्रण प्रसिद्ध छायाचित्रकार बिनाय दीक्षित यांनी केले आहे.

अमेरिकन टपाल सेवेने हिंदुस्थानच्या या पारंपरिक रांगोळी कलेचे भरभरून कौतुक केले आहे. रांगोळी ही जमिनीवर रेखाटली जाणारी एक सळसळती आणि जिवंत कलाकृती असून ती पारंपरिकपणे रंगीत तांदळाची पिठी, खडू आणि फुलांच्या पाकळ्यांच्या माध्यमातून साकारली जाते, असे यूएसपीएसने आपल्या माहितीत म्हटले आहे. तसेच रांगोळी ही घरात समृद्धी आणि सौभाग्य आणणारी मानली जाते, असा उल्लेखही त्यांनी केला आहे. या रांगोळीची डिझाईन तयार करणाऱ्या संगीता भुतडा या मूळच्या हिंदुस्थानच्या असून त्या गेल्या अनेक वर्षांपासून ह्युस्टन परिसरात स्थायिक आहेत. गेल्या जवळपास 30 वर्षांपासून त्या रांगोळी या हिंदुस्थानच्या प्राचीन लोककलेची अत्यंत निष्ठेने जोपासना करत आहेत. या विशेष तिकिटाची मूळ रचना जेनिफर अर्नॉल्ड यांनी केली असून विल्यम जे. गिकर यांनी या प्रकल्पाचे कला दिग्दर्शन केले आहे. हे बहुप्रतीक्षित दिवाळी टपाल तिकीट येत्या ऑक्टोबर महिन्यात अधिकृतपणे जारी केले जाईल.

हिंदू कॅलेंडरमधील अत्यंत महत्त्वाच्या आणि पवित्र सणांपैकी एक असलेला हा वार्षिक शरद ऋतूतील उत्सव असत्यावर सत्याच्या आणि अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक आहे. दिवाळी हा सण सहसा पाच दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि यंदा म्हणजेच 2026 मध्ये या सणाचा मुख्य दिवस 8 नोव्हेंबर रोजी असणार आहे, अशी माहितीही अमेरिकन टपाल सेवेने दिली आहे. या दिवाळी तिकिटासोबतच, यूएसपीएसने अमेरिकन कोस्ट गार्ड, ख्रिसमस कुकीज, ज्यू धर्मीयांचा दिव्यांचा सण ‘हनुका’ आणि आफ्रिकन-अमेरिकन संस्कृतीचे दर्शन घडवणारा उत्सव ‘क्वांझा’ यांना समर्पित करणारी विशेष टपाल तिकिटे देखील जारी करण्याची घोषणा केली आहे.