
केरळ क्रिकेट असोसिएशनने (केसीए) माजी हिंदुस्थानचा क्रिकेटपटू एस. श्रीशांतला मोठा दिलासा दिला आहे. ‘केसीए’ने त्याच्यावर लादलेली तीन वर्षांची बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर केलेल्या टिप्पणीमुळे ‘केसीए’ने श्रीशांतला तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते.
भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आज (बुधवारी) झालेल्या ‘केसीए’च्या विशेष सर्वसाधारण सभेत त्याच्या माफीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याने बिनशर्त खेद व्यक्त केल्यामुळे या सभेत एकमताने बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला, पण संघटनेने श्रीशांतला ताकीद दिली की, भविष्यात असे कोणतेही वर्तन केल्यास कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. बंदी उठवल्यानंतर श्रीशांत केरळ क्रिकेट लीगच्या (केसीएल) तिसऱ्या हंगामात एरीज कोल्लम सेलर्स फ्रँचायझीचा सह मालक म्हणून काम सुरू ठेवू शकतो. ‘केसीए’ने गेल्या हंगामापूर्वी ही बंदी घातली होती.



























































