तामीळनाडूत टीव्हीके आमदारांना 35 कोटींची ऑफर; विजय यांचे सरकार पाडण्याचा डाव उधळला… तीन दलालांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात विरोधी पक्षांच्या आमदार-खासदारांची फोडाफोडी सुरू असताना तामीळनाडूत विजय यांचे सरकार थेट उलथवून टाकण्याचा डाव पोलिसांनी उधळला आहे. टीव्हीकेच्या आमदारांना 35 कोटींची ऑफर दिल्याचे समोर आले असून या प्रकरणी तीन दलालांना अटक करण्यात आली आहे. सरकार स्थापनेनंतर अवघ्या दोन महिन्यांतच हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

टीव्हीकेचे आमदार एन. इलय्याराजा यांनी यासंदर्भात पोलीस तक्रार केली होती. त्यानुसार, इंडियन पॉलिटिकल डेमोक्रॅटिक स्ट्रटेजीज नावाची संस्था चालवणाऱ्या एका माणसाने त्यांना फोन केला. मोठय़ा राजकीय पक्षाच्या वतीने बोलत असल्याचे त्याने सांगितले. तामीळनाडू विधानसभेच्या अध्यक्षांच्या विरोधातील संभाव्य ठरावाच्या बाजूने मतदान करण्याची विनंती त्याने केली. त्यासाठी 35 कोटी रुपयांची ऑफरही दिली. इलय्याराजा यांनी ही ऑफर नाकारल्याने त्यांना धमकी देण्यात आली. याबाबत कुणालाही सांगू नका असे त्यांना सांगण्यात आले. मात्र, त्यांनी या प्रकाराबाबत लगेचच पोलीस तक्रार केली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला व तिघांना अटक केली. थिरुनवक्करासू, नरेश, थिगागराजन अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

द्रमुकवर संशय

अटकेतील आरोपींपैकी नरेश हा चेन्नईचा असून तो द्रमुकचे कोइम्बतूर दक्षिणचे आमदार व्ही. सेंथिल बालाजी यांचा भाऊ व्ही अशोक कुमार यांना भेटला होता. तर, थिरुनवक्करासू हा सेंथिल बालाजी व अशोक कुमार यांच्या सूचनांचे पालन करत होता, असा आरोप आहे. त्यामुळे प्रमुख विरोधी पक्ष द्रमुक वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

पराभव पचला नाही!

या घडामोडींवरून टीव्हीकेने द्रमुकचे नेते स्टॅलिन यांच्यावर तोफ डागली आहे. ‘मागील 40 दिवसांपासून द्रमुकचे लोक आमच्या आमदारांना आमिष दाखवून पह्डण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वी एका आमदाराला धमकी देण्यात आली होती. सर्व आरोपी सेंथिल बालाजी यांच्या जवळचे आहेत, असा दावा मंत्री पी. निर्मल कुमार यांनी केला.