
उपवर्गीकरणाच्या नावाखाली होणाऱ्या आरक्षणाच्या विभागणीचा डाव उधळून लावण्यासाठी ‘उपवर्गीकरणविरोधी पुनर्विलोकन समिती’च्या वतीने मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. हजारो आंबेडकरी कार्यकर्ते मुंबईत धडकले. परवानगीशिवाय हा मोर्चा काढल्याने आझाद मैदान पोलिसांनी आयोजकांवर आज गुन्हा दाखल केला.
या मोर्चात बौद्ध, ढोर, होलार, मातंग आणि चर्मकार यांसह अनुसूचित जातींमधील हजारो समाजबांधव सहभागी झाले होते. अनुसूचित जातींचे ‘अ, ब, क, ड’ असे उपवर्गीकरण करण्याच्या प्रक्रियेला तत्काळ स्थगिती द्यावी आणि न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करावा या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.




























































