शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश; काळाचौकी जिजामाता नगरचा एसआरए प्रकल्प लवकरच मार्गी लागणार, अजय चौधरी यांनी वेधले सरकारचे लक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ajay chaudhary shiv sena

काळाचौकी येथील जिजामाता नगर एसआरए प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. या प्रकल्पामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या सोडवून प्रकल्पाला गती देण्यात येईल. यासंदर्भात माझ्या दालनात बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री शंभुराज देसाई यांनी शुक्रवारी विधानसभेत दिले.

एसआरए प्रकल्पाच्या एका लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत भाग घेताना शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी काळाचौकीचा रखडलेला जिजामाता नगर एसआरए प्रकल्प लवकर सुरू करण्यासाठी विकासकाला आदेश देणार का, असा सवाल केला. त्यावर बैठक बोलावण्याचे आश्वासन मंत्री देसाई यांनी दिले

विधानसभा अध्यक्षांनी मुंबईतल्या एसआरएच्या विविध योजनांना भेट द्यावी, अशी सूचना अजय चौधरी यांनी यावेळी केली. कारण एसआरए प्रकल्प म्हणजे आडव्या झोपडपट्टीची उभी झोपडपट्टी केली आहे. एसआरए योजनेत काय परिस्थिती आहे हे मुंबईतल्या कोणत्याही आमदाराला विचारा. मनाला वाटेल तशा इमारती बांधत आहेत. गुरांचे गोठे परवडले, पण एसआरएची घरे नकोत. कोंबडीचे खुराडे तयार केले आहेत. म्हणून एसआरएची बैठक घ्यावी. एसआरएच्या इमारतींचा आकार कसा असावा, इमारत कशी बांधण्यात यावी याची मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणार का, असा सवाल अजय चौधरी यांनी केला. त्यावर एसआरए इमारती लोकांना राहण्यायोग्य असाव्यात अशा पद्धतीच्या सूचना एसआरएला दिल्या जातील, असे आश्वासन शंभुराज देसाई यांनी दिले.