
अयोध्येतील राम मंदिर देणगी घोटाळ्याचे प्रकरण ताजे असतानाच आता उत्तराखंडमधील प्रसिद्ध बद्रीनाथ धाममध्येही देणगी गैरव्यवहार झाल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणावरून सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने (बीकेटीसी) तातडीने पावले उचलली असून संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
या गंभीर आरोपांची निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने चौकशी करण्यासाठी मंदिर समितीकडून एका विशेष चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या कथित गैरव्यवहारात संशयित असलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांकडून तात्काळ स्पष्टीकरण मागवण्यात आले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. यासोबतच मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी सुरू करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान कोणताही गैरप्रकार किंवा दोषी आढळल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही आणि संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांचेही प्रशासनाने खंडन केले आहे. या प्रकरणातील एका कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याचा “वैयक्तिक सचिव” म्हटले जात होते. मात्र, धामचे चेअरमन हेमंत द्विवेदी यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. संबंधित व्यक्ती कोणताही वैयक्तिक सचिव नसून तो बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचा (बीकेटीसी) एक नियमित सरकारी कर्मचारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, चौकशीत आरोप खरे ठरल्यास कायद्यानुसार कठोर कायदेशीर पावले उचलली जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
#WATCH | Shri Badarinath Kedarnath Temple Committee (BKTC) Chairman Hemant Dwivedi says, “Regarding the news and allegations circulating on social media concerning the alleged misappropriation of donations and offerings at the Shri Badrinath-Kedarnath Temple Dham, I wish to state… pic.twitter.com/sLU559gqfw
— ANI (@ANI) July 4, 2026
समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोहन सिंग रंगड यांनी याविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या घटनेसंदर्भात 2 जुलै रोजी तक्रार प्राप्त झाली होती. त्यानंतर बद्रीनाथ मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. सध्यातरी हे फुटेज काहीसे अस्पष्ट आहे. मात्र, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. सर्व उपलब्ध पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे अंतिम अहवाल सादर करण्यासाठी एक अंतर्गत चौकशी पथक तयार केले जात आहे. तपासादरम्यान कोणतीही अनियमितता किंवा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला तर, ‘श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समिती अधिनियम, 1939’ आणि कर्मचारी आचारसंहिता नियमांनुसार दोषींवर कठोर कायदेशीर आणि विभागीय कारवाई केली जाईल. तसेच, तपास पूर्ण होईपर्यंत जनतेने कोणत्याही अपुऱ्या माहितीच्या आधारे दिशाभूल करणारे आरोप सोशल मीडियावर पसरवू नयेत, असे आवाहनही रंगड यांनी केले आहे.





























































