
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील अतिशय महत्त्वाकांक्षी समजल्या जाणाऱ्या ‘मिसिंग लिंक’ (Missing Link)च्या बोगद्याजवळ दरड कोसळल्याची घटना घडली. कोणत्याही नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यास सक्षम असल्याचा दावा या प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या वेळी करण्यात आला होता. मात्र पहिल्याच पावसात सरकारच्या या दाव्याची पोलखोल झाली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
”मिसिंग लिंकवर durability चेक करण्यासाठी खड्डे पडले होते, मग आज durability चेक करण्यासाठी दरड कोसळली आहे का? मिसिंग लिंकच्या कामात केवळ दलाली आणि भ्रष्टाचाराची लिंक झाल्याने सुरक्षाच मिसिंग झाली आहे. गेल्या चार-पाच दिवसात पुण्यापासून मुंबईपर्यंत पावसाने या नतभ्रष्ट सरकारच्या पोकळ दाव्यांची पोलखोल करत या भ्रष्ट सरकारचे काळे कारनामे उघड केले आहेत. या नतभ्रष्ट सरकारला जनता माफ नाही करणार”, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.
मिसिंग लिंकच्या बोगद्याजवळ दरड कोसळल्याने बोगद्याच्या संरक्षक भिंतीचा भाग पुलावर कोसळला. यावेळी पुलावर कोणतेही वाहन नसल्याने जिवितहानी झाली नाही. मात्र, मिसिंग लिंक वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.





























































