
फुटबॉल आणि संगीत प्रेमींसाठी एक अतिशय रोमांचक बातमी समोर आली आहे. 2026 च्या फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इतिहास रचला जाणार असून, या स्पर्धेत पहिल्यांदाच भव्य ‘हाफटाइम शो’चे आयोजन केले जाणार आहे. या पहिल्या-वहिल्या ऐतिहासिक हाफटाइम शोमध्ये सादरीकरण करणाऱ्या दिग्गज कलाकारांच्या यादीत आता लोकप्रिय पॉप स्टार जस्टिन बिबर सामील झाला आहे. या महाअंतिम सामन्याच्या मंचावर जस्टिन बिबर एकटा नसून, तो जागतिक कीर्तीची पॉप आयकॉन मॅडोना, प्रसिद्ध गायिका-नृत्यांगना शकिरा आणि जगभरात धुमाकूळ घालणारा कोरियन पॉप बँड ‘बीटीएस’ (BTS) यांच्यासोबत एकत्र मंचावर आपला जलवा दाखवणार आहे. दिग्गज आंतरराष्ट्रीय कलाकारांची ही फळी पाहता हा कार्यक्रम जगभरातील प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा ठरणार हे निश्चित आहे.
या ऐतिहासिक शोमध्ये केवळ जस्टिन बिबर सोबत आफ्रोबीट्स स्टार बूर्ना बॉय, व्हेनेझुएलाचे प्रसिद्ध संगीत संयोजक गुस्तावो दुदामेल आणि न्यूयॉर्कच्या स्टेटन आयलंड येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा नामांकित ‘PS22 कोरस’ समूह देखील सादरीकरण करणार आहे. विशेष म्हणजे, या PS22 कोरससोबत जगप्रसिद्ध बँड ‘कोल्डप्ले’ देखील मंचावर दिसेल. कोल्डप्लेचा आघाडीचा गायक ख्रिस मार्टिन याने आयोजित केलेला हा 11 मिनिटांचा धमाकेदार हाफटाईम शो 19 जुलै रोजी अंतिम सामन्यादरम्यान रंगणार आहे. या शोच्या माध्यमातून ‘फिफा ग्लोबल सिटीझन एज्युकेशन फंड’ला आर्थिक पाठबळ दिले जाईल, ज्याद्वारे मुलांचे शिक्षण आणि फुटबॉलच्या सुविधांच्या विकासासाठी 100 दशलक्ष यूएस डॉलर्सचा निधी उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या संदर्भात आनंद व्यक्त करताना जस्टिन बीबरने सांगितले की, फिफा वर्ल्ड कप संपूर्ण जगाला अशा अनोख्या पद्धतीने एकत्र आणतो जी इतर कशानेही शक्य नाही. या ऐतिहासिक शोचा भाग होणे आणि त्या माध्यमातून जगभरातील मुलांच्या शिक्षणासाठी मदत होत असल्याचे पाहणे हा एक अत्यंत समाधानाचा अनुभव असल्याची भावना त्याने व्यक्त केली.
सामान्यता फुटबॉलच्या सामन्यांमध्ये चॅम्पियन्स लीगच्या फायनल सामन्यापूर्वी संगीत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आणि अमेरिकन फुटबॉलमधील ‘सुपर बाउल’ सारखे हाफटाईम शो फुटबॉलमध्ये पाहायला मिळत नाहीत. त्यामुळे यंदाचा फिफाचा प्रयोग हा प्रयत्न क्रीडा जगतात नवा इतिहास रचणारा ठरेल.


























































