
महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेने जागतिक अॅथलेटिक्समध्ये इतिहास रचला. मोनॅको डायमंड लीग स्पर्धेत २.२६ मीटर उंच उडी मारत त्याने कांस्यपदक पटकावले आणि या स्पर्धेत उंच उडीमध्ये पदक जिंकणारा पहिला हिंदुस्थानी ठरला.
सर्वेशची ऐतिहासिक झेप
३१ वर्षीय सर्वेश कुशारेने २.२६ मीटर उंच उडी मारत डायमंड लीगमध्ये तिसरे स्थान पटकावले. या कामगिरीसह तो या स्पर्धेत उंच उडीतील पहिला व एकूण चौथा हिंदुस्थानी अॅथलीट ठरला. यापूर्वी ही कामगिरी नीरज चोप्रा, विकास गौडा व मुरली श्रीशंकर यांनी केली होती.
सर्वेशने टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता मुताझ एसा बार्शिम, इटलीचा जियानमार्को तांबेरी आणि अमेरिकेचा जुवॉन हॅरिसन यांसारख्या दिग्गजांना मागे टाकत ही ऐतिहासिक कामगिरी केली. युक्रेनच्या ओलेह डोरोशचुकने (२.३२ मीटर) सुवर्ण, तर ब्रिटनच्या जॅक किमनीने (२.३० मीटर) रौप्यपदक जिंकले.
नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या सर्वेशने बालपणी शेतातील कचरा आणि कापसापासून तयार केलेल्या तात्पुरत्या गादीवर सराव सुरू केला होता. दोन आठवड्यांपूर्वीच त्याने भुवनेश्वर येथे २.३१ मीटर उडी मारून नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता. या कामगिरीमुळे तो यंदाच्या हंगामातील आशियातील उंच उडीमधील अव्वल आणि जगातील संयुक्त चौथा सर्वोत्तम हायजम्पपटू ठरला आहे.




























































