
एनडीएमधील प्रथम सत्रातील कॅडेट अभिनव बाजपेयी (वय 17, रा. कानपूर, उत्तर प्रदेश) याचा शुक्रवारी सकाळी नियमित प्रशिक्षणा दरम्यान प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाला. या घटनेची चौकशी करण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत. कॅडेट अभिनव बाजपेयीने 24 जून रोजी अकादमीत प्रवेश घेतला होता. शुक्रवारी सकाळी नियमित शारीरिक प्रशिक्षण सुरू असताना, पहिल्या पीटी परेडदरम्यान त्याला अस्वस्थ वाटत असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने त्याला लष्करी रुग्णालय खडकवासला येथे दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेमागील नेमके कारण आणि सर्व परिस्थितीची सखोल माहिती मिळविण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी नियुक्त करण्यात आली आहे. चौकशी अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, मृत कॅडेटच्या कुटुंबीयांना तसेच संबंधित पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.




























































