केडीएमसीच्या शाळांमध्ये आता ‘सिव्हिक सेन्स’, दरमहा अहवाल सादर करण्याचे शिक्षण विभागाचे निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

कल्याण-डोंबिवलीतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘सिव्हिक सेन्स’ अर्थात नागरिक शिष्टाचार व सामाजिक जबाबदारी हा विषय शिकविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने यासंदर्भात महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांना निवेदन दिले होते. विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेच्या मागणीची दखल घेत शिक्षण विभागाने सर्व शाळांना परिपत्रक जारी केले आहे.

केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे शिवसेनेचे माजी शहरप्रमुख सचिन बासरे यांनी एका निवेदनाद्वारे ‘सिव्हिक सेन्स’ सह गांभीर्य लक्षात आणून दिले होते. या निवेदनात केवळ शैक्षणिक गुणवत्तेवर भर न देता विद्यार्थ्यांमध्ये जबाबदार नागरिकत्वाची जाणीव निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले होते. त्यानुसार शाळांमध्ये नियमित मार्गदर्शन, कार्यशाळा, प्रबोधनपर उपक्रम आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याची मागणी करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना सुरक्षित, दर्जेदार आणि सुसज्ज शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे बासरे यांनी निवेदनात म्हटले होते. या निवेदनाची दखल घेत पालिका प्रशासनाने शाळांमध्ये ‘सिव्हिक सेन्स’ विषय शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण विभागाचे प्रशासक अधिकारी भारत बोरनारे यांनी पालिकेच्या तसेच सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या खासगी शाळांमध्ये दर आठवड्याला घेतल्या जाणाऱ्या मूल्यवर्धनाच्या दोन तासिकांपैकी एक तासिका ‘सिव्हिक सेन्स’ या विषयासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

सामाजिक बांधिलकी आणि जबाबदार नागरिकत्व
शिक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात सर्व मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना ‘सिव्हिक सेन्स’ विषयाची प्रभावी अंमल बजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, जबाबदार नागरिकत्व आणि सकारात्मक वर्तन विकसित होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास सचिन बासरे यांनी व्यक्त केला.