
रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोलाड येथे रिव्हर राफ्टिंगच्या थरारादरम्यान एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नाथ अमर (२६) असे पर्यटकांचे नाव असून मुंबईच्या विक्रोळी येथे राहणारा आहे. या घटनेमुळे राफ्टिंगच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
नाथ अमर हे कोलाड येथे शनिवारी रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेत होते. राफ्टिंग सुरू असताना सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बोट थेट धगडवाडी गावाच्या हद्दीत आली आणि पाण्यातील दगडावर जोरात आदळली. या धडकेमुळे बोट उलटून नाथ अमर हे खोल पाण्यात बुडाले. त्यानंतर त्यांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले, अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
रिव्हर राफ्टिंग गाईड गणपती रावत यांनी दिलेल्या माहितीवरून बोट दगडावर आदळून उलटली झाली. याप्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा पंचनामा पोलिसांनी केला आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन रोहा उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास कोलाड पोलीस करत आहेत.
































































