
चार मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सदनिकेच्या खिडकीची लोखंडी जाळी कोसळून दोन मुले गंभीर जखमी झाली. अब्दुल रहमान आणि असद अशी जखमी मुलांची नावे असून त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिवान शाह दर्गा रोडवरील हुसैन आर्केड इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर अफजल शाह हे राहतात. त्यांच्या घरी गैबीनगर येथून नातेवाईक आले होते. अब्दुल रहमान आणि असद ही दोन मुले खिडकीला बसविण्यात आलेल्या लोखंडी जाळीवर बसून खेळत होती. मात्र अचानक दोन्ही मुलांसह जाळी कोसळली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दोन्ही मुलांना जवळील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.



























































