FIFA World Cup 2026 – मेस्सीच्या जादूला हॅरी केनचे आव्हान, अर्जेंटिना-इंग्लंड आमने सामने; दुसरी सेमी फायनल आज रंगणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फुटबॉल विश्वचषकाच्या दुसऱया उपांत्य फेरीत आज जगभरातील कोट्यवधी चाहत्यांचे लक्ष खिळवणारा महासंग्राम रंगणार आहे. गतविजेता अर्जेंटिना आणि इंग्लंड या तुल्यबळ सघांत अटलांटामध्ये होणारी लढत ही केवळ अंतिम फेरीचे तिकीट मिळविण्यासाठी नव्हे, तर फुटबॉलमधील सर्वात कट्टर प्रतिस्पर्ध्यांतील आणखी एका ऐतिहासिक अध्यायाची सुरुवात ठरणार आहे.

दिएगो मॅराडोनाच्या ‘हॅण्ड ऑफ गॉड’ गोलपासून ते डेव्हिड बेकहॅमच्या रेड कार्डापर्यंत या दोन संघांतील प्रत्येक विश्वचषक सामना वाद, नाटय़ आणि थराराने गाजला आहे. तब्बल 24 वर्षांनंतर दोन्ही संघ पुन्हा विश्वचषकात आमने सामने येत आहेत. यंदाच्या विश्वचषकात प्रथमच लिओनेल मेस्सी इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. दुसरीकडे हॅरी केन आणि ज्यूड बेलिंगहॅम यांच्या जोरावर इंग्लंड अंतिम फेरीच्या उंबरठय़ावर उभा आहे. या सामन्यातील विजेता रविवारी होणाऱया अंतिम फेरीत जगज्जेतेपदाच्या झळाळत्या करंडकावर नाव कोरण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार आहे.

इंग्लंडच्या विजयाची शक्यता

ऑप्टा सुपरकॉम्प्युटरनुसार इंग्लंडच्या नियोजित वेळेतील विजयाची शक्यता 38.9 टक्के, तर अर्जेंटिनाची 34.1 टक्के आहे. सामना अतिरिक्त वेळेत जाण्याची शक्यता 27 टक्के वर्तविण्यात आली आहे.

मेस्सी विरुद्ध केन सामना

अर्जेंटिनासाठी लिओनेल मेस्सी हा सर्वात मोठा आधार आहे. आठ गोलांसह तो ‘गोल्डन बूट’च्या शर्यतीत आघाडीवर असून विश्वचषकातील त्याच्या गोलांची संख्या 21 वर पोहोचली आहे. लौतारो मार्टिनेझ, एन्झो फर्नांडेझ आणि लिसांद्रो मार्टिनेझ यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. इंग्लंडकडून हॅरी केन आणि ज्यूड बेलिंगहॅम यांनी प्रत्येकी सहा गोल करत संघाच्या 13 पैकी 12 गोलांत थेट योगदान दिले आहे. बुका यो साका आणि अँथनी गॉर्डन यांच्या आक्रमक खेळीवरही इंग्लंडची मोठी भिस्त असेल.

इतिहास काय सांगतो?

दोन्ही संघ आतापर्यंत 14 वेळा आमने सामने आले आहेत. त्यामध्ये इंग्लंडने 6, अर्जेंटिनाने 3 सामने जिंकले, तर 5 सामने अनिर्णित राहिले. विश्वचषकात मात्र दोघांमध्ये पाच लढती झाल्या असून इंग्लंडने तीन, तर अर्जेंटिनाने दोन विजय मिळवले आहेत. 2002 मध्ये झालेल्या अखेरच्या विश्वचषक सामन्यात इंग्लंडने 1-0 असा विजय मिळवला होता.

दोन्ही संघांची खरी कसोटी

मेस्सीच्या जादुई खेळीमुळे अर्जेंटिना कोणत्याही क्षणी सामना फिरवू शकतो, मात्र बाद फेरीत त्यांना अपेक्षेपेक्षा अधिक संघर्ष करावा लागला आहे. दुसरीकडे इंग्लंडची आक्रमक फळी तगडी असली तरी बचावातील त्रुटींवर प्रशिक्षक थॉमस टुशेल यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

अर्जेंटिनाइंग्लंड लढतीच्या तिकिटांसाठी दुप्पट तिकीट दर

फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यात रंगणाऱया महासंग्रामाची व्रेझ शिगेला पोहोचली आहे. या लढतीच्या तिकिटांसाठी चाहत्यांनी अक्षरशः झुंबड उडवली असून तिकिटांचे दर फ्रान्स-स्पेन सामन्याच्या तुलनेत दुप्पट झाले आहेत. ‘तिकीट डेटा. कॉम’नुसार डॅलसमधील फ्रान्स-स्पेन उपांत्य फेरीच्या तिकिटाची किमान किंमत 1,325 डॉलर असून गेल्या तीन दिवसांत त्यात 26 टक्क्यांची घसरण झाली आहे. मात्र अटलांटामधील अर्जेंटिना-इंग्लंड सामन्याचे तिकीट 2, 841 डॉलरवर पोहोचले असून तीन दिवसांत त्यात 34 टक्क्यांची उसळी घेतली आहे.