
जोगेश्वरी पश्चिमच्या ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पतीने पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना आज रात्री घडली. नेमकी हत्या कोणत्या वादातून झाली हे स्पष्ट झाले नाही. हल्लेखोर पतीला ओशिवरा पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
मृत महिला आणि तिचा पती हे दोघे जोगेश्वरी पश्चिम येथील फुटपाथवर राहत होते. ते दोघे भिक्षा मागून उदरनिर्वाह करत होते. आज सायंकाळी त्यांच्यात वाद झाला. संतापलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात दगड मारून जखमी केले. तसेच पत्नीच्या गळ्यावर गंभीर दुखापत केली. या घटनेची माहिती समजताच ओशिवरा पोलीस घटनास्थळी गेले. जखमी अवस्थेत असलेल्या महिलेला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ओशिवरा पोलिसांनी महिलेच्या पतीला ताब्यात घेतले. हत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.




























































