आम्ही शिवसेनेशी एकनिष्ठ, विश्वासाला तडा जाऊ देणार नाही; नाशिकमधील शिवसेना नगरसेवकांचा उद्धव ठाकरे यांच्याकडे विश्वास व्यक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपण आणि नाशिककरांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. कुठल्याही आमिषाला व दबावतंत्राला न जुमानता आम्ही सर्वजण शिवसेनेतच राहू, असा ठाम विश्वास नाशिकमधील शिवसेना नगरसेवकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केला.

नाशिक महापालिकेतील शिवसेना नगरसेवक फुटणार, एकनाथ शिंदे गटाकडे जाणार, असे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसारित करून अफवा पसरविण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी सर्व पंधरा नगरसेवकांनी ‘मातोश्री’ येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, चर्चा केली. एकनाथ शिंदे गटाच्या आमिषाला एकही नगरसेवक बळी पडणार नाही. प्रभागातील विकासासाठी निधी न देण्याच्या, विकासकामे अडविण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या दबावतंत्राला आम्ही जुमानणार नाही. शिवसेना सोडून एकही नगरसेवक अन्य गटात जाण्याचा विचारसुद्धा करणार नाही. आपण आम्हाला उमेदवारी दिली. आपल्यावर व पक्षावर विश्वास टाकून जनतेने आम्हाला विजयी केले आहे. त्या नाशिककर जनतेच्या आणि पक्षाच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. जनसेवा, शहर विकासासाठी झटत राहू, असा ठाम विश्वास या सर्व पंधरा नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केला.

नाशिक शहरातील समस्यांची माहिती यावेळी उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांकडून घेतली. सर्व समस्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहा, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी शिवसेना नेते, सचिव विनायक राऊत, जिल्हा संपर्क उपनेते रवींद्र मिर्लेकर, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, जिल्हा संघटक, गटनेते केशव पोरजे, महानगरप्रमुख प्रथमेश गीते, नगरसेवक शैलेश ढगे, मुरलीधर भामरे, योगेश गाडेकर, योगेश भोर, नगरसेविका भारती ताजनपुरे, मंगला आढाव, वैशाली दाणी, वैशाली दळवी, सीमा पवार, माधुरी डेमसे, रुचिरा साळवे, प्रमिला मैंद, संजीवनी हांडोरे यांच्यासह संतोष साळवे, राहुल ताजनपुरे, विनोद दळवी, संजय हांडोरे, मदन डेमसे, विशाल पवार, प्रीतम भामरे आदी हजर होते.