
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दानपेटी लुटीच्या निषेधार्थ शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्र. 12 च्या वतीने आज ठाकूरद्वार झावबावाडी येथील प्रभू श्रीराम मंदिर येथे ‘रामरक्षा महाआरती’, श्रीरामरक्षा स्तोत्र पठण, हनुमान चालिसा पठण करण्यात आले. यावेळी संपूर्ण मंदिर परिसर ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी दुमदुमून गेला. उपस्थितांनी यावेळी मंदिरातील लुटीच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीरामरक्षा स्तोत्र पठणाने झाली. महाराज कल्पेशजी उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान चालिसाचे सामूहिक पठण करण्यात आले. त्यानंतर प्रभू श्रीरामांची महाआरती करण्यात आली. यावेळी शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, उपनेते रवींद्र मिर्लेकर, अरुण दुधवडकर, दिवाकर (बाबी) देव, माजी आमदार अरविंद नेरकर, विभाग संघटक युगंधरा साळेकर, नगरसेविका संपदा मयेकर यांच्यासह दक्षिण मुंबई विभागातील महिला-पुरुष पदाधिकारी, युवासेना, युवतीसेना, संलग्न संघटनांचे पदाधिकारी तसेच असंख्य श्रीरामभक्त आणि हिंदू बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्र. 12 चे विभागप्रमुख संतोष शिंदे यांनी केले.































































