इलेक्ट्रिक स्कूटरला चार्जिंग सुरू असताना स्फोट; नोएडात पाच मजली इमारतीला आग, दोघांचा होरपळून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इमारतीच्या तळमजल्यावर इलेक्ट्रिक स्कूटर चार्जिंगला लावली असताना स्कूटीमध्ये अचानक स्फोट झाला. यामुळे पाच मजली इमारतीला भीषण आग लागली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून, एक लहान मुलगा आणि एक तरुणी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नोएडा येथील सेक्टर-६६ मधील मामुरा परिसरातील एका ५ मजली इमारतीत ही आग लागली. इमारतीत राहणाऱ्या जवळपास ५० कुटुंबांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतींच्या छतांवर शिड्या लावून लोकांना सुरक्षित बाहेर काढले. ज्या ठिकाणी आग लागली तो परिसर अतिशय गर्दीचा आहे. या ठिकाणी नोकरदार वर्ग मोठ्या संख्येने राहतो.

ई-स्कूटीमध्ये शॉर्ट सर्किट (स्पार्किंग) झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. स्कूटीला लागलेल्या आगीमुळे शेजारी उभ्या असलेल्या इतर दुचाकींनाही आग लागली. प्राथमिक तपासात निष्काळजीपणा उघडकीस आल्याने संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, इमारतीचा लीजधारक आणि ऑपरेटरला अटक करण्यात आली आहे.

आग लागल्यानंतर नागरिक प्रचंड घाबरले आणि त्यांनी तत्काळ अग्निशमन दल व पोलिसांना पाचारण केले. मात्र, सुमारे एक ते दीड तासानंतर अग्निशमन दलाची गाडी पोहोचली आणि पोलीसही उशिराने घटनास्थळी आले, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.