चेंबूर झाड दुर्घटनेची नव्याने चौकशी होणार; महापौरांनी अहवाल फेटाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेंबूर येथे झाड कोसळून ११ वर्षीय विहान श्रीवास्तवच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी आता नव्याने होणार आहे. चेंबूर दुर्घटनेप्रकरणी गेल्या आठवड्यात सादर झालेल्या अहवालात चौकशी समितीने सर्वांना ‘क्लीन चिट’ दिली होती. यावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. एका निष्पाप मुलाचा मृत्यू होऊनही संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. त्यानंतर गुरुवारी झालेल्या सभेत महापौर रितू तावडे यांनी हा चौकशी अहवाल फेटाळून लावला. अहवालात जबाबदारी निश्चित करण्यात अपयश आल्याचे सांगत महापौरांनी संपूर्ण प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

सभागृह नेते गणेश खणकर यांनी अहवालावर टीका करत, उद्यान विभागाने हरकत नोंदवूनही रस्ते विभागाने कंत्राटदाराला एकही नोटीस बजावली नसल्याचा आरोप केला. ‘११ वर्षांच्या मुलाच्या जिवाची किंमत फक्त ७ लाख रुपयांचा दंड आहे का?’ असा सवाल करीत त्यांनी ‘थर्ड पार्टी’ चौकशी करण्याची मागणी केली. तसेच, निषेध म्हणून त्यांनी सभागृहात चौकशी अहवालाची प्रत फाडली. तर, ‘रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामाची गुणवत्ता तपासणी करताना साइट इंजिनिअरने आम्हाला झाडांचे संरक्षण केले जाईल अशी खात्री दिली होती, मात्र आमची दिशाभूल करण्यात आली,’ असा आरोप महापौरांनी केला.

प्रशासनाची सारवासारव

अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी स्पष्ट केले की, झाड दुर्घटनेची चौकशी उद्यान विभागाने नव्हे, तर स्वतंत्र विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीने केली आहे. समितीने झाड पडण्यामागे एकच कारण असल्याचा निष्कर्ष काढलेला नाही. सुमारे ६० ते ७० वर्षे जुने असलेले हे झाड आतून पूर्णपणे पोकळ झाले होते. वैज्ञानिकदृष्ट्या असे झाड नेमके कधी कोसळेल, याचा अचूक अंदाज बांधणे अत्यंत कठीण असते, असे ढाकणे म्हणाले. मुंबईत सुमारे ३० लाख झाडे असून त्यापैकी सुमारे २ लाख झाडे रस्त्यांच्या कडेला आहेत; त्यामुळे त्यांचे निरीक्षण करणे हे मोठे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेनंतर रस्ते आणि नाला बांधकामादरम्यान झाडांच्या संरक्षणासाठी महापालिकेने नवीन ‘एसओपी’ (SOP) तयार केली असून, कर्मचाऱ्यांना झाडांची वैज्ञानिक पद्धतीने छाटणी आणि देखभाल करण्याचे प्रशिक्षणही दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.