
1 मार्च 1958. हीच ती तारीख जेव्हा जमैकातील सबिना पार्कवर विक्रमांचे एव्हरेस्ट सर केले गेले. तेव्हा समोर पाकिस्तानचे गोलंदाज होते आणि मैदानावर वेस्ट इंडीजचा 21 वर्षांचा एक सडपातळ, डावखुरा तरुण फलंदाज गॅरी सोबर्स उभा होता. या खेळीपूर्वी त्याच्या नावावर कसोटीत एकही शतक नव्हते. तेव्हा कुणालाही कल्पना नव्हती की, हा फलंदाज चक्क दोन दिवस फलंदाजी करील आणि विश्वविक्रम रचेल. पण त्याने चक्क दोन दिवस फलंदाजी केली आणि क्रिकेटच्या इतिहासाचं सर्वांत भव्य चित्र रंगवलं.
तेव्हा सोबर्स फलंदाजी करत नव्हते, ते जणू चित्रकारासारखे कॅनव्हासवर ब्रश फिरवत होते. पाकिस्तानचे गोलंदाज निष्प्रभ भासत होते. सोबर्स यांच्या बॅटीतून निघालेले कव्हर ड्राइव्ह, स्ट्रेट ड्राइव्ह बंदुकीतून गोळी सुटावी तसे सुटत होते.
त्यांच्या धावा वाढतच होत्या. शतक झालं. दीडशतक झालं. द्विशतकही ओलांडलं. मग त्रिशतक! त्या काळी त्रिशतक म्हणजे एव्हरेस्ट सर करण्याइतकं अशक्य मानलं जायचं. पण सोबर्स त्या दिवशी एव्हरेस्टवर थांबणाऱ्यांतले नव्हते. त्यांना आकाशाला स्पर्श करायचा होता. स्कोअरबोर्डवर 365 हा आकडा झळकला आणि क्रिकेट काही क्षण स्तब्ध झालं. लेन हटन यांच्या 364 धावांचा विश्वविक्रम एका धावेने त्यांनी मागे टाकला. ही फक्त धाव नव्हती, क्रिकेटच्या इतिहासाने एक पान उलटल्याचा आवाज होता. त्यांनी चक्क 614 मिनिटे म्हणजे 10 तास 14 मिनिटे फलंदाजी केली. 38 चौकार लगावले. यात एकही षटकार नव्हता. हटनला मागे टाकताच विंडीज कर्णधार गेरी ऍलेक्झांडर यांनी 3 बाद 790 धावांवर डाव घोषित केला. या डावात त्यांनी सलामीवीर कोनराड हंटबरोबर दुसऱया विकेटसाठी 446 धावांची विक्रमी भागीही रचली होती. हंटने 260 धावा केल्या होत्या.
वयाच्या 21व्या वर्षी खेळाडू संघात स्थान टिकवण्यासाठी झगडत असताना सोबर्सने रचलेला पराक्रम पाहून सारेच चक्रावले होते. हटन यांचा विक्रम 20 वर्षांनंतर सोबर्स यांनी मोडला. मात्र त्यांचा नाबाद 365 धावांचा विक्रम तब्बल 36 वर्षे अभेद्य राहिला. 1994 मध्ये ब्रायन लाराने 375 धावा करत तो मोडला, पण त्या विक्रमाचा पाया सोबर्स यांनीच घातला होता. त्या खेळीने फक्त विक्रम मोडला नाही, तिने क्रिकेटला एक नवा सम्राट दिला.
दोन दिग्गज एका व्यासपीठावर

सर गॅरी सोबर्स आणि महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हे दोन दिग्गज खेळाडू एकाच व्यासपीठावर 2003 साली आले होते. दक्षिण आफ्रिकेत 2003 साली वर्ल्ड कप खेळवण्यात आला होता. या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारत पराभूत झाला होता. पण या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा सचिनच्या नावावर होत्या. त्यामुळे सचिनला वर्ल्ड कपमधील ‘सर्वोत्तम खेळाडू’ हा पुरस्कार देण्यात आला. हा मानाचा पुरस्कार सचिनला प्रदान करण्यासाठी व्यासपीठावर सर सोबर्स यांना पाचारण करण्यात आले होते.




























































