
अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) उल्हासनगरमधील कॅम्प तीन परिसरात असलेल्या एका म्हशीच्या तबेल्यावर छापा मारून बंदी घालण्यात आलेले ६१२ ऑक्सिटोसिन इंजेक्शन जप्त केले. जादा दुधासाठी तबेल्याचा मालक या घातक इंजेक्शनचा डोस म्हशींना देत होता. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कॅम्प तीनमधील एका तबेल्यात म्हशींना ऑक्सिटोसिन इंजेक्शनचा डोस दिला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याची गंभीर दखल घेत मध्यवर्ती पोलिसांचे गुन्हे प्रकटीकरण पथक आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांनी उल्हासनगर कॅम्प ३ येथील ओटी सेक्शन, जसलोक हायस्कूलजवळ असलेल्या तबेल्यावर छापा टाकला. या कारवाईमध्ये तबेला चालक प्रकाश वाधवानी (६४) याच्या ताब्यातून ऑक्सिटोसिन इंजेक्शनच्या ६१२ प्लास्टिकच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. प्राथमिक चौकशीत या इंजेक्शनचा वापर म्हशींकडून कृत्रिमरीत्या लवकर दूध उतरवण्यासाठी केला जात असल्याचे उघड झाले.
ही कारवाई मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाळासाहेब कोबरणे, पोलीस हवालदार सुभाष सूर्यवंशी, जितेंद्र चौधरी, पोलीस शिपाई किशोर काळे, एफडीएचे औषध निरीक्षक मनीष घोतमारे आणि जोसेफ चिरमेल यांनी केली.
बंदी घालण्यात आलेल्या औषधांचा बेकायदेशीर वापर करणाऱ्यांविरोधात तसेच जनावरांवर क्रूरता करणाऱ्यांविरोधात यापुढेही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सातत्याने सुरू राहणार आहेत, असा इशारा एफडीएच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिला.































































