
गणेशमूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्यां कच्च्या मालाच्या किमती 25 ते 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत. शिवाय वाहतूक खर्चासह कारगिरांच्या मजुरीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवावर महागाईचे विघ्न असून वाढलेल्या किमतीमुळे बाप्पाची मूर्ती खरेदी करण्यासाठी गणेशभक्तांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत. मर्यादित बजेटमध्ये वाढत्या खर्चाचा ताळमेळ घालताना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची मोठी कसरत होणार आहे.
मुंबई शहरासह उपनगरात सुमारे 12 हजार गणेशोत्सव मंडळे आहेत. जून महिन्यापासूनच गणेशचित्र कार्यशाळांमध्ये बाप्पाची मूर्ती साकारण्याची लगबग सुरू झाली आहे. मूर्तिकारांना साधारण दोन ते तीन महिने आधी मंडप उभारावे लागतात. मंडप उभारणीसाठीचा खर्च गेल्या वर्षीपेक्षा जवळपास दुप्पट झाल्याचे मूर्तिकार सांगतात. अनेक मूर्तिकार पेण, हमरापूर येथून कच्च्या मूर्ती आणतात. मध्यंतरी या परिसरात बसलेला पावसाचा फटका तसेच इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चात झालेल्या वाढीमुळे प्रत्येक मूर्तीमागील उत्पादन खर्च मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. साहजिकच याची झळ गणेशोत्सव मंडळांसह सर्वसामान्य गणेशभक्तांना बसणार आहे.
अशी झाली दरवाढ
प्लॅस्टर ऑफ पॅरिसची 25 किलोची गोणी 175 रुपयांवरून 220 रुपयांवर, काथ्याचा दर 850 रुपयांवरून एक हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. प्लायवूडच्या किमतीत 15 ते 20 टक्के, रंगांमध्ये दहा टक्के वाढ झाली आहे. महागाईचा फटका मजुरीलाही बसला आहे. पूर्वी 700 रुपयांमध्ये मिळणारा कारागीर आता एक हजार रुपये तर मूर्तीचे फिनिशिंग करणाऱ्यां कुशल कारागिराची रोजंदारी दोन हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे मूर्तिकारांनाही महागाईची झळ बसली आहे, असे गोरेगाव येथील श्री गणेश आर्ट्स कार्यशाळेचे मूर्तिकार विफुल जाधव यांनी सांगितले.































































