
शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लाभार्थी शेतकऱ्यांची प्राथमिक यादी उद्याच जाहीर केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. यामुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कर्जमाफी योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांची यादी कृषी व सहकार विभागाने बनवली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून ती उद्याच प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित चित्रप्रदर्शनाचेही उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले.
जुलैपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे – कृषिमंत्री
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला दुजोरा दिला. २२ जुलै रोजी अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्याचा प्रयत्न आहे. त्यानंतर ३० जुलैपर्यंत टप्प्याटप्याने पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात रक्कम वर्ग केली जाईल. आयकर भरणाऱ्या मोठ्या शेतकऱ्यांची माहिती उपलब्ध नसल्यामुळे यादी अंतिम करण्यात अडचणी येत होत्या, असे ते म्हणाले.





























































