
जम्मू-काश्मीरच्या किश्तवार जिल्ह्यात पोलिसांना दहशतवादविरोधी कारवाईत मोठे यश मिळाले आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या नेटवर्कचा पर्दाफाश करत पोलिसांनी मोहम्मद रफीक नाइक नावाच्या एका प्रमुख दहशतवादी समर्थकाला अटक केली आहे.
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मोहम्मद रफीक नाइक हा छत्रू परिसरातील सैफुल्लाह ग्रुपचा प्रमुख ग्राउंड हँडलर म्हणून सक्रिय होता आणि तो पाकिस्तानी दहशतवाद्यांना विविध प्रकारची मदत पुरवत होता. छत्रू भागात झालेल्या वेगवेगळ्या चकमकींमध्ये पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या सैफुल्ला गटाचे सर्व सात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यामध्ये गेल्या वर्षी चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता, तर स्वयंघोषित कमांडर सैफुल्लासह उर्वरित तीन दहशतवादी फेब्रुवारी महिन्यात मारले गेले होते.
यापूर्वी छत्रू येथील रहिवासी असलेल्या मुनीर अहमद आणि मश्कूर अहमद या दोघांना दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. दहशतवाद्यांचे हे संपूर्ण नेटवर्क शोधून ते पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांचा कसून तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.





























































