विवाहित प्रेयसीच्या तोंडावर उशी दाबून घेतला प्रियकराने बळी, ठाण्याच्या लॉजमधील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इतरांशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून विवाहित प्रेयसीच्या तोंडावर उशी दाबून प्रियकराने जीव घेतल्याची भयानक घटना ठाण्यातील एका लॉजमध्ये घडली आहे. संध्या म्हस्के असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी ठाणेनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच प्रियकर नंदकिशोर गाडेकर याच्या मुसक्या आवळल्या आहेत. मृत महिला आणि आरोपी एकाच गावातील असून त्यांची फेसबुकवर मैत्री झाली होती.

संध्या म्हस्के या पतीपासून विभक्त होऊन भांडुप येथे राहत होत्या. तर नंदकिशोर हा विवाहित असून तो डोंबिवलीचा राहणारा आहे. या दोघांची ओळख फेसबुकवर झाली होती. एकाच गावातील असल्याने जवळीक वाढली आणि गेल्या पाच वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र नंदकिशोर हा संध्याच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे दोघांचे नेहमी खटके उडत होते. ठाण्याच्या जांभळी नाका परिसरातील महाराजा लॉजवर दोघे गेले. त्यावेळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

आरोपीला अटक

नंदकिशोरने आधी संध्याला मारहाण केली आणि नंतर उशीने तोंड दाबून तिची हत्या केली. त्यानंतर तो खोलीबाहेर पडला. वेटरने महिलेबाबत विचारणा केली असता ‘ती फ्रेश होऊन येईल,’ असे सांगून तो निघून गेला. मात्र बराच वेळ झाला तरी महिलेचा प्रतिसाद न मिळाल्याने लॉज कर्मचाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन खोली उघडली असता संध्याचा मृतदेह पडलेला होता. सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी तलावपाळी परिसरातून नंदकिशोरला अटक केली. त्याची अधिक चौकशी केली असता इतरांशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून हे कृत्य केल्याची त्याने कबुली दिली.