
पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील गोंधळाविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने शनिवारी बिहारमध्ये रौद्ररूप धारण केले. डाव्या संघटनांकडून शनिवारी बिहार बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी पाटणा, भागलपूर, छप्रा, औरंगाबाद, सीवान, समस्तीपूर आणि सहरसा यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले.
आंदोलन रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज आणि धरपकडीनंतर अनेक ठिकाणी हिंसक चकमकी उडाल्या असून आंदोलकांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली. या घटनेत अनेक विद्यार्थी आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी पाटणआ येथील ऐतिहासिक गांधी मैदानावर एकत्र येण्याचा इशारा दिला होता. मात्र, पोलिसांनी संपूर्ण परिसराला छावणीचे रूप देत मैदान सील केले. डाकबंगला चौकात पुढे सरकणाऱ्या जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यानंतर परिस्थिती अधिक चिघळली. छप्रा आणि भागलपूरमध्येही आंदोलकांनी घोषणाबाजी करत पोलिसांवर दगडफेक केली.
Chhapra, Bihar: Protesters set a district administration vehicle on fire and resorted to stone-pelting during the Bihar Bandh demonstrations over competitive examination and NEET-related controversies pic.twitter.com/mwO1yOcGik
— IANS (@ians_india) July 25, 2026
तेज प्रताप यादव पोलिसांच्या ताब्यात
विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जनशक्ति जनता दलाचे नेते तेज प्रताप यादव घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी त्यांना तत्काळ ताब्यात घेतले. “आम्ही देशातील तरुणांच्या हक्कासाठी आणि भविष्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार आहोत,” असे तेज प्रताप यांनी अटकेवेळी सांगितले.
बिहारमध्ये कुठे काय घडतंय?
- छप्री येथे आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि आंदोलकांनी रस्त्यावर जाणाऱ्या एका इनोव्हा कारवर हल्ला केला. आंदोलकांनी कारच्या काचा फोडल्या.
- भागलपूरमध्येही आंदोलन चिघळले असून तिलकामांझी चौकात जमावाने पोलिसांची पेट्रोलिंग गाडी पटली केली आणि दगडफेक करत एसडीएम यांच्या गाडीसह इतर वाहनांचेही नुकसान केले.
- एका भाजप नेत्याच्या गाडीवरही आंदोलकांनी हल्ला केला. गर्दी पांगण्यासाठी भाजप नेत्याच्या बॉडीगार्डने पिस्तूल बाहेर काढली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
- सीवानमध्ये दगडफेकीमध्ये एसपी पूरन झा जखमी झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी डीएमना रस्त्यावर उतरावे लागले. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, तसेच लाठीचार्जही केला.
- लखीसरायमध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर पोलिसांवर बॉटल, चप्पल आणि दगडफेक करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला.




























































