
ऑनलाइन मागवलेल्या अॅपल आयफोन 14 प्रोऐवजी दाढी वाढवण्याचे तेल पाठवल्याप्रकरणी मुंबई ग्राहक तक्रार निवारण आयोगाने ऑनलाइन पोर्टल फ्लिपकार्टसह विक्रेत्याला दणका दिला आहे. आयोगाने भरपाईपोटी ग्राहकाला 1.8 लाख देण्याचे आदेश दिले.
पवई येथील तक्रारदाराने 22 एप्रिल 2023 रोजी फ्लिपकार्टवरून 1 लाख 11 हजार 793 रुपयांना आयफोन 14 प्रो खरेदी केला होता. मागवलेले चार्जर आणि कव्हर वेळेत मिळाले; मात्र दुसऱ्या दिवशी आलेल्या पार्सलमध्ये आयफोनऐवजी दाढी वाढवण्याचे तेल आले. याप्रकरणी तक्रारदाराने ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे दाद मागितली. आयोगाने फ्लिपकार्टसह विक्रेत्याला दोषी ठरवले. फ्लिपकार्टने योग्य चौकशी न करता चुकीचे पार्सल परत घेतले नाही, बदलून उत्पादन दिले नाही किंवा पैसे परत केले नाहीत. उलट तक्रार वारंवार निकाली काढली असे दाखवण्यात आले. ही कृती सेवेतील त्रुटी आणि अनुचित व्यापार पद्धत असल्याचे आयोगाने स्पष्ट केले तसेच 1 लाख 11 हजार 793 रुपये परत करावेत. या रकमेवर 22 एप्रिल 2023 पासून प्रत्यक्ष परतफेड होईपर्यंत 9 टक्के वार्षिक व्याज द्यावे. तसेच मानसिक त्रा 50 हजार रुपये नुकसानभरपाई व 20 हजार रुपये न्यायालयीन खर्च 45 दिवसांच्या आत देण्याचे आदेश दिले.

























































