
ज्वलंत हिंदुत्वाचे पुरस्कर्ते, मराठी माणसांमध्ये आत्मसन्मानाचा धगधगता अंगार पेटवणारे हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना गुरुवंदना अर्पण करण्यासाठी बुधवारी दिवसभर ‘मातोश्री’ निवासस्थानी निष्ठावंत शिवसैनिकांची रीघ लागली. गुरुपौर्णिमेनिमित्त मुंबईसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून शिवसैनिक आले आणि शिवसेनाप्रमुखांच्या आसनापुढे नतमस्तक झाले. गुरुवंदनेसाठी प्रत्येक शिवसैनिकाने मोठय़ा निष्ठेने हातातून आणलेली चाफ्याची फुले आणि हार यामुळे वातावरणात गुरुपौर्णिमेचे अखंड चैतन्य संचारले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या मानवंदनेचा स्वीकार केला. आपण सर्वजण बाळासाहेबांनी दिलेला गुरुमंत्र लक्षात ठेवून कार्य करू, अशी भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मराठी अस्मितेचे बुलंद आवाज हेते. आजही शिवसेनाप्रमुखांचे विचार तमाम मराठीजनांना आणि शिवसैनिकांना नवचैतन्य देतात. न्याय्य हक्कांसाठी संघर्षाचे बळ देतात. त्याच जाणिवेतून दरवर्षी गुरुपौर्णिमेला ‘मातोश्री’ निवासस्थानी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून शिवसैनिक हजेरी लावतात. गुरुवंदनेसाठी शिवसैनिकांनी बुधवारी सकाळपासून रांगा लावल्या आणि शिवसेनाप्रमुखांची प्रतिमा व आसनाला वंदन केले. बाळासाहेबांना प्रिय असलेली चाफ्याची फुले आणि चाफ्याचा हार अर्पण करताना शिवसैनिक भावनिक झाले होते. आम्ही बाळासाहेबांनी दिलेली शिकवण, त्यांची ज्वलंत विचारधारा डोळय़ापुढे ठेवूनच मार्गक्रमण करणार असल्याचे वचन देत प्रत्येक शिवसैनिक बाळासाहेबांच्या आसनापुढे नतमस्तक होत होता.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, अनिल परब, राजन विचारे, अंबादास दानवे, आमदार मिलिंद नार्वेकर, सुनील शिंदे, अनंत (बाळा) नर, उपनेते विनोद घोसाळकर, भाऊ कोरगावकर, गुरुनाथ खोत, उपनेत्या विशाखा राऊत, रमेश कोरगावकर, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, परशुराम उपरकर, सुप्रदा फातर्पेकर, नगरसेवक श्रद्धा जाधव, निशिकांत शिंदे, प्रवीणा मोरजकर, संपदा मयेकर, स्नेहल शिवकर, पैलासनाथ पाठक, ठाणे शहरप्रमुख अनिश गाढवे, विभाग संघटक विश्वनाथ सावंत, गजानन लाड, अॅड. मेराज शेख, चंद्रकांत खोपडे आदींनी ‘मातोश्री’ निवासस्थानी हजर राहून शिवसेनाप्रमुखांना वंदन केले.
बाळासाहेबांच्या आसनापुढे नतमस्तक होण्याची तीव्र इच्छा होती. ती इच्छा गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूर्ण झाली हे माझे मोठे भाग्य आहे, अशी प्रतिक्रिया बुलढाण्यातून आलेल्या शिवसैनिकाने व्यक्त केली. ज्येष्ठ शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. याचवेळी सर्वांनी बाळासाहेबांनी दाखवलेल्या वाटेवर चालून पक्ष संघटना आणखी बळकट करण्याचा निर्धार केला.
‘मातोश्री’ निवासस्थानी गुरुवंदनेसाठी बुधवारी दिवसभर शिवसैनिकांचा ओघ सुरू होता.
गुरुवंदनेसाठी ‘मातोश्री’वर आलेल्या शिवसैनिकांच्या प्रेमाचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदरपूर्वक स्वीकार केला. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अॅड. अनिल परब, अंबादास दानवे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
शिवसेनाप्रमुखांच्या आसनावर चाफ्याची फुले अर्पण
गुरुपौर्णिमेनिमित्त सुरुवातीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुखांना आदरांजली अर्पण केली. शिवसेनाप्रमुखांना आवडती चाफ्याची फुले त्यांच्या आसनावर वाहून सर्वजण नतमस्तक झाले. बाळासाहेब आणि माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या तसबिरीलाही चाफ्याचा पुष्पहार अर्पण करण्यात आला.
शिवतीर्थावरील स्मृतिस्थळावरही पुष्पांजली
शिवतीर्थावरील शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळावरही पुष्पांजली अर्पण करण्यासाठी शिवसैनिकांची रीघ लागली होती. मुंबईच्या शहर आणि उपनगरांतील शिवसैनिक, शिवसेनाप्रेमी नागरिक मोठय़ा संख्येने शिवतीर्थावर दाखल झाले होते. अनेकांनी सकाळीच शिवसेनाप्रमुखांना वंदन करून नंतर कामाचे ठिकाण गाठले. शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला होता.



























































