पुण्याचा श्वास कोंडला! धूळ-धुराने प्रदूषणाचा विळखा; वर्षातील फक्त 92 दिवसच हवा चांगली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘स्वच्छ आणि सुंदर पुणे’च्या घोषणा एकीकडे सुरू असताना दुसरीकडे शहरातील हवा मात्र दिवसेंदिवस अधिक प्रदूषित होत असल्याचे महापालिकेच्या २०२५-२६च्या पर्यावरण स्थिती अहवालातून समोर आले आहे. शहरातील अनेक भागांमध्ये धूलिकणांचे (पीएम-१०) प्रमाण राष्ट्रीय मर्यादेपेक्षा अधिक नोंदवण्यात आले असून, सूक्ष्म धूलिकणांचे (पीएम-२.५) प्रमाणही शिवाजीनगर आणि लोहगाव परिसरांत धोकादायक पातळीवर पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. धूळ, वाहनांचा धूर, बांधकामे आणि कचरा जाळण्याच्या प्रकारांमुळे पुणेकरांचा श्वास अक्षरशः कोंडत असल्याचे चित्र आहे.

महापालिनेरुच्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६मधील ३६५ दिवसांपैकी अवघे ९२ दिवसच हवेची गुणवत्ता चांगली होती. १२२ दिवस हवा समाधानकारक, १२० दिवस मध्यम, तर ३१ दिवस ‘थेट खराब’ श्रेणीत नोंदवण्यात आले. म्हणजेच वर्षातील बहुतांशी काळ पुणेकरांना अपेक्षित दर्जाची स्वच्छ हवा मिळालेली नाही.
शिवाजीनगर, लोहगाव, कात्रज, पाषाण आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात धूलिकणांचे (पीएम-१०) प्रमाण राष्ट्रीय वार्षिक मर्यादेपेक्षा अधिक नोंदवण्यात आले, तर शिवाजीनगर आणि लोहगावमध्ये सूक्ष्म धूलिकणांचे (पीएम-२.५) प्रमाणही चिंताजनक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

रस्त्यांवरील धूळ, वेगाने सुरू असलेली बांधकामे, वाढती वाहतूककोंडी, वाहनांतून होणारे धुराचे उत्सर्जन आणि कचरा जाळण्याच्या घटना यांमुळे शहरातील प्रदूषण वाढत असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पावसाळ्यात प्रदूषणात काहीशी घट होत असली, तरी पावसाळ्यानंतर आणि हिवाळ्यात वाऱ्याचा वेग कमी झाल्याने प्रदूषके हवेत न विखुरता जमिनीजवळच साचून राहतात. त्यामुळे नोव्हेंबर ते फेब्रुवारीदरम्यान प्रदूषणाचा आलेख झपाट्याने वाढत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

ठळक बाबी

  • चांगली हवा – ९२ दिवस
  • समाधानकारक हवा – १२२ दिवस
  • मध्यम हवा – १२० दिवस
  • खराब हवा – ३१ दिवस
  • धूलिकणांची (पीएम-१०) राष्ट्रीय वार्षिक मर्यादा – ६० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर
  • धूलिकणांच्या (पीएम-१०) प्रदूषणात बांधकाम क्षेत्राचा अंदाजित वाटा – २३ टक्के