शहा पुण्यात, कश्मीरात दहशतवादी हल्ला, धर्म विचारून गोळ्या घातल्या; 2 हिंदू मजुरांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज पुण्यात असताना तिकडे जम्मू-कश्मीर दहशतवादी हल्ल्याने हादरून गेले. कश्मीरमधील कुलगाम येथे दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या. यामध्ये दोन हिंदू मजुरांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे.

कुलगाम जिह्यातील केलम गावात वीटभट्टीवर काम करणाऱ्या दीपके रट्रे (20) आणि बोपिंदर (28) या छत्तीसगडमधील स्थलांतरित मजुरांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. यात ते गंभीर जखमी झाले. हल्ल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र एकाचा उपचाराआधीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याने शनिवारी पहाटे श्रीनगरमधील रुग्णालयात प्राण सोडला.

पहलगामप्रमाणे हल्ला

पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याप्रमाणेच कुलगामचा हल्ला झाला. हल्लेखोरांनी गोळ्या झाडण्याआधीच मजुरांना त्यांची नावे विचारली. त्यांनी नावे सांगताच दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळे कश्मीरमधील स्थलांतरित मजुरांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

केंद्राच्या सुरक्षेच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह

जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला, तर उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी केंद्र सरकारच्या सुरक्षेच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गेल्या 37 वर्षांपासून जम्मू-कश्मीर दहशतवादाशी झगडत आहे. कलम 370 हटवल्यानंतर सर्व काही सुरळीत झाल्याचा दावा केंद्र सरकारने केला होता. मात्र आजही निष्पाप लोक मारले जात आहेत. त्यामुळे सगळे प्रयोग अपयशी ठरले का, याचे उत्तर केंद्र सरकारने द्यावे, असे चौधरी म्हणाले.

देशाची सुरक्षा मजबूत असल्याचा दावा अजित डोवाल यांना पुरस्कार

जेन-झी आंदोलन झाल्यापासून गायब असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमात दिसले. पुण्यात त्यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात आला. यावेळी शहांनी डोवाल यांचे काwतुक केले. ‘मोदींच्या नेतृत्वामुळे व डोवाल यांच्या प्रयत्नांमुळे गेल्या 12 वर्षांत देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा मजबूत झाल्याचा दावा त्यांनी केला. देशाची परराष्ट्र नीती ताठ कण्याची झाली आहे’, असेही ते म्हणाले.