
विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच हार्बर लाईनवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान ब्लॉक असेल. या ब्लॉक काळात मेन लाईनवरील सर्व जलद लोकल धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. जलद आणि धिम्या लोकल एकाच मार्गावरून धावणार असल्याने मेन लाईनच्या प्रवाशांची रविवारच्या लोकल प्रवासात गैरसोय होण्याची शक्यता आहे.
माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर रविवारी सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.36 ते दुपारी 3.10 या वेळेत सुटणाऱ्या जलद मार्गावरील गाड्या माटुंगा येथून डाऊन धिम्या मार्गावर वळवल्या जातील.
ठाणे येथून पुढे जाणाऱ्या जलद गाडय़ा मुलुंड येथून पुन्हा जलद मार्गावर वळवल्या जातील. तसेच ठाणे येथून सकाळी 11.03 ते दुपारी 3.38 या वेळेत सुटणाऱ्या अप जलद गाडय़ा मुलुंड स्थानकावर अप धिम्या मार्गावर वळवल्या जातील. ब्लॉक काळातील या बदलामुळे सर्वच लोकल गंतव्यस्थानी 15 मिनिटे उशिरा पोहोचण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाने वर्तवली आहे.
























































