
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण करणारा शिंदे गटाचा नगरसेवक रमेश सुक्या म्हात्रे हाच होता, यावर आता फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने शिक्कामोर्तब केले आहे. ज्या दालनात म्हात्रेकडून डॉक्टरांना मारहाण झाली त्या दालनातील सीसीटीव्ही फुटेज फॉरेन्सिकच्या पथकाने तपासले आहेत. फुटेजमधील म्हात्रेसह डॉक्टर, परिचारिकांच्या आवाजाची पडताळणी करून हा आवाज त्यांचाच असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. ही तपासणी सकाळी ११ पासून ते रात्री ८ पर्यंत सुमारे नऊ तास सुरू होती. गुन्ह्यातील बारकावे शोधले जाऊ लागल्यामुळे म्हात्रेच्या अडचणीत वाढ झाली आहे.
फॉरेन्सिक विभागाचे तांत्रिक पथकाने शास्त्रीनगर रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजची सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय तसेच पोलीस उपायुक्त कार्यालयात सखोल तपासणी केली आहे. रमेश सुक्या म्हात्रे आणि त्यांचे सहकारी रुग्णालयात दाखल झाल्यापासून ते डॉक्टरांना मारहाण करून बाहेर पडेपर्यंतच्या संपूर्ण घटनाक्रमाचा अभ्यास करण्यात आला आहे. तपासादरम्यान सीसीटीव्ही चित्रातील हालचाली, संवाद, शिवीगाळ, डॉक्टरांशी झालेला वाद तसेच घटनेच्या वेळी रुग्णालयातील प्रत्यक्ष परिस्थितीचे बारकाईने विश्लेषण करण्यात आले आहे. सीसीटीव्हीमधील प्रतिमा आणि ध्वनीमध्ये कोणत्याही प्रकारचा तांत्रिक फेरबदल झालेला नसल्याची खातरजमा फॉरेन्सिक पथकाने केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या गुन्ह्याचा तपास स्थानिक विष्णुनगर पोलीस ठाण्याकडून काढून तो थेट कल्याण पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्याकडे सोपवला असल्याने तपासाची गती वाढली असून पुरावे अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे.
ठेकेदाराचीही चौकशी
शास्त्रीनगर रुग्णालयात सीसीटीव्ही यंत्रणा बसवणाऱ्या ठेकेदार संस्थेच्या प्रतिनिधींचीही फॉरेन्सिक आणि तपास पथकाने चौकशी केली. त्यांच्याकडून सीसीटीव्ही प्रणाली, हार्डडिस्क आणि इतर तांत्रिक बाबींबाबत माहिती घेण्यात आली. त्यानंतर संबंधित हार्डडिस्क व अन्य डिजिटल पुरावे पंचांच्या उपस्थितीत सीलबंद करून तपास अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून पुढील तपासाच्या विश्लेषणासाठी ते प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत.























































